रिंकू राजगुरूने अशाप्रकारे केले तिचे वजन कमी, जाणून घ्या तिचा डाएट प्लान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:46 PM2019-06-04T16:46:17+5:302019-06-04T16:47:41+5:30
कागर या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वी रिंकूच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांचा पाहायला मिळाला होता. या व्हिडिओमधील रिंकूचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे.
सैराट या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला सैराट इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.
सैराट या चित्रपटानंतर काही महिने तरी रिंकूने कोणत्या चित्रपटात काम केले नव्हते. कागर या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वी तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांचा पाहायला मिळाला होता. या व्हिडिओमधील रिंकूचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण तिने कित्येक किलो वजन कमी केले होते. रिंकूने वजन कशाप्रकारे कमी केले याबाबत तिने न्यूज १८ लोकमतसोबत गप्पा मारल्या होत्या.
त्यावेळी तिने सांगितले होते की, सैराट संपल्यानंतर माझ्या लक्षात आले की, माझे वजन चांगलेच वाढले आहे. मी खूपच जाडी दिसत असल्याचे मला जाणवत होते. वजन वाढणे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले नसते. त्यामुळे वजन कमी करण्याचे मी ठरवले. त्यावेळी मी दहावीची परीक्षा देत होते. मी वजन कमी करण्यासाठी सकाळी चार वाजता उठून चालायला जायचे. तसेच थोडा बहुत व्यायाम करायचे. मी डाएट देखील खूप चांगल्या प्रकारे केले. मी केवळ सलाडच खात असे. खरे तर मला गोड पदार्थ खूप आवडतात. पण मी पूर्णपणे गोड सोडले होते. एवढेच नव्हे तर माझ्या घरात गोड बनवले जात असेल तर मी तिकडे फिरकायची पण नाही. तसेच माझ्यासमोर कोणी गोड खात असेल तर मी तिथून लगेचच उठून जायचे. हे सगळे करून मी दोन महिन्यात १० ते १२ किलो वजन कमी केले. या सगळ्याचा मला खूप फायदा झाला. मी वजन कमी करण्यासाठी कोणत्याही ट्रेनरची मदत घेतली नाही. माझी आई माझी ट्रेनर आणि डायटिशियन होती.