"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट
By कोमल खांबे | Updated: March 21, 2025 12:51 IST2025-03-21T12:51:03+5:302025-03-21T12:51:31+5:30
परश्याचा भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या आकाश ठोसरने 'सैराट' पुन्हा प्रदर्शित होताच पोस्ट शेअर केली आहे.

"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट
नागराज मंजुळेंच्या 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. आता ९ वर्षांनी आज पुन्हा हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'सैराट' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याने पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. परश्याचा भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या आकाश ठोसरने सैराट पुन्हा प्रदर्शित होताच पोस्ट शेअर केली आहे. आकाशने सैराट सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तो म्हणतो, "सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच माझ्यासाठी स्वप्नवत होता, आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचं प्रवास तुम्ही बघतच आलाय. आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय आणि याचा मला आज खरंच खूप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून मला जगता येणारे, बघता येणारे. आणि हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! @nagraj_manjule सैराटमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल मी आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद".
आकाशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच सैराट २ कधी येणार अशी विचारणाही चाहते करत आहेत. सैराटनंतर झुंड, घर बंदूक बिर्यानी, फ्रेंडशिप अनलिमिटेड अशा अनेक सिनेमांमध्ये आकाश दिसला. लवकरच तो 'बाल शिवाजी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.