लहान बाळामुळे अडीच तास थांबलं होतं 'सैराट'चं शुटिंग; नागराज मंजुळेंनी सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 03:26 PM2023-11-10T15:26:05+5:302023-11-10T15:26:55+5:30
Sairat: एका लहान बाळामुळे तब्बल १०० जणांची टीम खोळंबली होती.
मराठी कलाविश्वातील माइलस्टोन ठरलेला सिनेमा म्हणजे सैराट (sairat). नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. इतंकच नाही तर आजही हा सिनेमा प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. या सिनेमाशी निगडीत अनेक किस्से आहेत. त्यातलाच एक मजेदार किस्सा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केला.
अलिकडेच नागराज मंजुळे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सैराटचे अनेक किस्से सांगितले. यावेळी बोलत असताना एका लहान मुलामुळे सैराटचं शुटिंग तब्बल अडीच तास थांबलं होतं, असं ते म्हणाले. सोबतच घडलेला हा किस्साही सांगितला.
"मला सैराट सिनेमाचा एक किस्सा आठवतोय. या सिनेमात एक लहान बाळ होतं. सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये. त्यावेळी आम्ही हैदराबादमध्ये शूट करत होतो. एक जागा काही तासांसाठी भाड्याने घेतली होती. एका बिल्डिंगवर आम्ही शुटिंग करत होतो आणि त्या बाळाला झोप लागली. सगळ्यांच्या मध्ये तो निवांत झोपला होता. आणि, सेटवर १०० लोकं त्याच्या उठण्याची वाट पाहत बसले होते", असं नागराज मंजुळे म्हणाले.
पुढे म्हणतात, "प्रत्येक जण येऊन एकच विचारत होतं काय बाळ उठलं का? आमचं असं झालं होतं राजेसाहेब झोपलेत आणि आम्ही अडीच-तीन तास वाट पाहिली. त्यानंतर तो उठला आणि मग सीन शूट केला. पण, लहान मुलांची अशी झोप मोडू शकत नाही. त्यांच्या मूडनुसार काम करावं लागतं. "
दरम्यान, सैराटचा समावेश लोकप्रिय सिनेमांच्या यादीत केला जातो. या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरु (rinku rajguru), आकाश ठोसर (aakash thosar) या फ्रेश जोडीने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.