"शब्दांमधून डंख मार..." ट्रोलर्सवर संतापले सलील कुलकर्णी, कवितेतून चांगलंच सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:24 IST2025-04-16T12:23:44+5:302025-04-16T12:24:23+5:30

सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केलाय.

Saleel Kulkarni Slams Trolls Through Poetry Shared Video On Social Media | "शब्दांमधून डंख मार..." ट्रोलर्सवर संतापले सलील कुलकर्णी, कवितेतून चांगलंच सुनावलं!

"शब्दांमधून डंख मार..." ट्रोलर्सवर संतापले सलील कुलकर्णी, कवितेतून चांगलंच सुनावलं!

Saleel Kulkarni Slams Trolls: सध्या सोशल मीडियावरील ट्रोलिंग प्रचंड वाढलं आहे. विशेष करुन कलाकारांना जास्त प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलिकडेच अभिनेत्री क्षिती जोगनं मंगळसूत्र घालणं, न घालणं, लग्नानंतर अडनाव बदलणं-न बदलणं यावर भाष्य केलं होतं. त्यावरून तिला ट्रोल केलं गेलं होतं. तर 'छावा' (Chhaava) सिनेमाच्या सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलल्याचं वक्तव्य रायाजीच्या भुमिकेत असलेल्या संतोष जुवेकरने (Santosh Juvekar केलं होतं. त्यावरून तो खूप ट्रोल झाला. सातत्यानं होणाऱ्या ट्रोलिंगवर काही कलाकारांनी सोशल मीडियावर 'कमेंट्स बॉक्स' बंद करण्याला प्राधान्य दिलं आहे.  तर काही कलाकार सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केलीय. आता सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक व दिग्दर्शक सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी ट्रोलर्संना कवितेतून चांगलंच सुनावलं आहे.

सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "एक निरीक्षण… अशा निनावी , आणि चेहरे नसलेल्या माणसांचं.. कुठून येतात ही माणसं ? कुठून येते ही वृत्ती ? कोणाविषयीच आदर न वाटणारी .. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात .. पण जो ऐकत असतो ,त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर ? तो जगण्यावर रुसला तर ? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली", असं त्यानी म्हटलं. 


सलील कुलकर्णींच्या कवितेवर एक नजर...

नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो...
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो…
याच्यासाठी काही म्हणजे काही लागत नाही, 
कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको,
 आपण नक्की कोण, कुठले, याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी, 
दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार, शब्दांमधून डंख मार, 
घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो...
 नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…
खाटेवरती पडल्या पडल्या चिखल उडव,
 ज्याला वाटेल, जसं वाटेल, धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे, फसवे रूप, 
जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल
 धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे,
जोपर्यंत तुटत नाही, धीर त्याचा सुटत नाही, 
सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू,
धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल तो 
तेवढ्यात दुसरे कोणी दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल,
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ,
मग घेऊ नवीन नाव, नवा फोटो, नवीन डाव,
त्याच शिव्या, तेच शाप, त्याच शिड्या, तेच सापवय, 
मान, आदर, श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो..
जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो…
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…
थोडा डेटा, खूप मजा, छंद किती स्वस्त आहे,
एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे
नवा डेटा पॅक दे ना आभाळावर थुंकीन म्हणतो...

Web Title: Saleel Kulkarni Slams Trolls Through Poetry Shared Video On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.