सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर दिग्गजांचा मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:17 AM2019-04-25T10:17:53+5:302019-04-25T10:29:11+5:30
यावेळी एक कोटी रुपये तर मंगेशकर परिवार आणि दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे १८ लाख रुपये दान करण्यात आले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले गेले. मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळयाचे वितरण नुकतेच षण्मुखानंद हॉल येथे पार पडले. यावेळी सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील शास्त्रीय नर्तकी सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव सलीम खान यांना प्रदान करण्यात आला तर भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार, तर हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले गेले.
साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले गेले. भद्रकाली प्रॉडक्शनचे 'सोयरे सकळ ' हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सीआरपीएफ डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना गृह मंत्रालया अंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्था 'भारत के वीर' साठी सम्मानित केले गेले. यंदाचा हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहिद ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्यात आला होता. यावेळी एक कोटी रुपये तर मंगेशकर परिवार आणि दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे १८ लाख रुपये दान करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथील पडद्यामागील कलाकार कै.विजय महाडिक यांच्या कुटुंबियांना देखील मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे ५०,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले.