संदीप पाठक व अश्विनी गिरीच्या "राख"ची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:43 PM2022-11-16T18:43:07+5:302022-11-16T18:49:41+5:30
"राख" या बहुचर्चित चित्रपटास त्याच्या प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत, विशेष म्हणजे "राख" हा एक संपूर्ण मूकपट आहे.
"राख" या बहुचर्चित चित्रपटास त्याच्या प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत, विशेष म्हणजे "राख" हा एक संपूर्ण मूकपट आहे. चित्रपटसृष्टीत या प्रयोगाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. "राख" या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले असून निर्माते योगेश गोलतकर, कुणाल प्रभू व राजेश चव्हाण यांनी 'मीडिया प्रो डिजिटल' या संस्थेमार्फत प्रथमच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात संदीप पाठक व अश्विनी गिरी हे दर्जेदार कलाकार प्रमुख भूमिकेत असून या दोन्ही कलाकारांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात, अचानक उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार गमावू लागल्याने, विपरीत परिणाम होऊन बेरोजगारीच्या संकटात भरडल्या गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या दाहक वास्तवाचे चित्रण ह्या चित्रपटात केले गेले आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), आशियातील सर्वात जुना व भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबर पासून गोवा येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर महोत्सवात फिल्म मार्केट मध्ये निवड झाल्याने "राख" या चित्रपटाची महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली आहे.