Sandeep Pathak : 'त्या' अपमानास्पद वागणुकीवर संदीप पाठक म्हणाला, 'दहा वेळा चहा मागितल्यावर तोंडावर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:43 AM2023-02-21T10:43:52+5:302023-02-21T10:47:23+5:30

संदीप सुरुवातीला मुंबईत अभिनय करण्यासाठी आला तेव्हा त्यालाही बराच स्ट्रगल करावा लागला होता.

sandeep pathak marathi actor opens up about his struggling days | Sandeep Pathak : 'त्या' अपमानास्पद वागणुकीवर संदीप पाठक म्हणाला, 'दहा वेळा चहा मागितल्यावर तोंडावर...'

Sandeep Pathak : 'त्या' अपमानास्पद वागणुकीवर संदीप पाठक म्हणाला, 'दहा वेळा चहा मागितल्यावर तोंडावर...'

googlenewsNext

मराठवाड्यातील छोट्या गावातून मुंबईत येऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता संदीप पाठक. त्याचा जबरदस्त अभिनय, कमाल कॉमिक टायमिंग यामुळे प्रेक्षकांचा तो लाडका आहे. मात्र संदीप सुरुवातीला मुंबईत अभिनय करण्यासाठी आला तेव्हा त्यालाही बराच स्ट्रगल करावा लागला होता. इतकंच नाही तर वाईट वागणूकही मिळायची असा खुलासा त्याने नुकताच केला आहे.

अभिनेता संदीप पाठक याने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात हजेरी लावली. तेव्हा संदीपला विचारण्यात आले की,'सेटवर कधी अपमानास्पद वागणूक मिळाली आहे का?' यावर उत्तर देताना संदीप म्हणाला, 'अर्थात, ती मिळायलाही हवी. अहो गरजेचीच असते ती. मोठं होण्याकरता अशी वागणूक फार गरजेची असते. सुरुवातीच्या काळात, बसायला खुर्चीही न मिळणं, दहा वेळा चहा मागितल्यानंतर तोंडावर चहा फेकून मारणं असे अनेक किस्से आहेत. पैसे मागायला गेलो की तर हमखास अशी वागणूक मिळायची. सिरीयलचा निर्माता कुणी हिंदीवाला असतो. आपले राहिलेले असतात १२०० रुपये आणि १५०० रुपये तर प्रतिदिनाप्रमाणे ते पाच ते सहा हजार होतात.हे पैसे आपण मागायला आत गेल्यावर त्यांचाच नोकर येऊन म्हणतो, ए चलो उठो, उठो, बाहर बैठो चलो. असं अनेकदा झालेलं आहे.'

याशिवाय संदीप मुंबई शहराबद्दलही भरभरुन बोलला. तो म्हणाला, 'आमच्या मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं पण नळाला येत नाही.मुंबई शहरात वेग पकडण्यासाठी चार वर्ष निघून जातात. मी वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिला. एवढं पाणी पाहून मला वेड लागायचंच बाकी होतं. कारण आमच्या मराठवाड्यात आजही आठवड्यातून एकदा पाणी येतं. त्यामुळे इथल्या बऱ्याच गोष्टींचं मला आश्चर्य वाटायचं.'

संदीप पाठकला मुंबईत येऊन आता २२ वर्ष झाली आहेत. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हे आधीच गाजलेले नाटक पुन्हा साकारण्याची संधी संदीपला मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. हे नाटक पुन्हा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. 

Web Title: sandeep pathak marathi actor opens up about his struggling days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.