संगीत देवबाभळी’ नाटकाचे २०० प्रयोग पूर्ण, रसिकांसह नसिरुद्दीन शाह यांच्यावरही नाटकाची मोहिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:05 PM2018-12-29T16:05:08+5:302018-12-29T16:05:08+5:30
पुण्यात या नाटकाचा २०० वा प्रयोग पार पडला. संगीत देवबाभळी हे संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे.
मराठी रंगभूमीवर दिवसागणिक दर्जेदार नाटकं सादर होत आहेत. या नाटकांना नाट्यरसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मराठी रंगभूमीवर गाजणारं असंच एक नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. या नाटकानं रसिकांसह दिग्गजांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकताच या नाटकाने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. पुण्यात या नाटकाचा २०० वा प्रयोग पार पडला. संगीत देवबाभळी हे संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे. तरीही नाटकात तुकोबा किंवा विठ्ठल नाही. देव आणि भक्त यांच्या पत्नींच्या माध्यमातून उलगडणारं हे नाटक आहे. हे दोन पात्री नाटक प्राजक्त देशमुख यांनी दिग्दर्शित केले आहे. खरं तर दोन कलाकारांचं नाटक आहे.
आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि रुक्मिणीच्या भूमिकेत मानसी जोशी. या दोघींनी आपापल्या भूमिकांना पूर्णपणे न्याय दिला असून समर्थ अभिनयाने त्या रसिकांसमोर मांडण्यात यशस्वी झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रंगमंचावर नसणारी पात्रं विठोबा आणि संत तुकाराम यांचा आभास निर्माण करण्यात या दोघीही यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळेच की काय सर्वसामान्य नाट्यरसिकांसह नसिरुद्दीन शाह यांच्यासारख्या रंगभूमी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्यालाही संगीत देवबाभळी या नाटकानं आणि शुभांगी सदावर्ते तसंच मानसी जोशी यांच्या अभिनयाने भुरळ घातली आहे.
या नाटकाचा प्रयोग पाहून झाल्यानंतर नसिरसाहेब दोघींजवळ गेले. असं नाटक तुम्ही करत आहात ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे अशा शब्दांत नसिरसाहेबांनी या दोघींच्या अभिनयाला पोचपावती दिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. संगीत देवबाभळी या नाटकाचा प्रयोग मुंबईत लागल्यास त्याला पुन्हा एकदा हजेरी लावेन आणि त्यावेळी सोबत मित्रांनाही घेऊन येईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.