संजय आणि मान्यता दत्तचा मराठी चित्रपट 'बाबा'ची आणखी एका पुरस्कार सोहळ्यात बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 08:42 PM2021-03-04T20:42:58+5:302021-03-04T20:43:45+5:30
'बाबा' या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि नंदिता पाटकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० मध्ये मराठी चित्रपट 'बाबा'ने सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ कथा आणि सर्वश्रेष्ठ फिल्म क्रिटिक्स अशा ३ मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. नागपुरकर राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि नंदिता पाटकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून ‘संजय दत्त प्रोडक्शन’च्या बॅनर खाली बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती मान्यता दत्तने केली आहे.
या विजयावर आनंद व्यक्त करताना मान्यता दत्त म्हणाली की, "हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण, हा आमचा म्हणजे संजय दत्त प्रोडक्शन्सचा मराठीतला पहिलाच प्रयत्न आहे. मी आभारी आहे आणि आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सर्वात मोठा सन्मान आमच्या टीमला जातो ज्यांनी या कहाणीला पडद्यावर जीवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, "हे क्षण आम्हाला उत्तम काम करण्यासाठी आणि उत्तम कामासोबत दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सदैव प्रोत्साहित करतील."
‘बाबा’ चित्रपटाने केवळ मान्यतालाच नव्हे, तर संपूर्ण भारतालाच अभिमान वाटला होता जेव्हा ‘गोल्डन ग्लोब’साठी नामांकित होणारा तो पहिला मराठी चित्रपट बनला होता आणि या प्रतिष्ठित समारोहात प्रदर्शित करण्यात आला होता.