घरातल्या किरकिरीवर संकर्षण कऱ्हाडेचा रामबाण उपाय, म्हणाला- "नातं म्हटलं की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:36 IST2025-03-28T17:35:31+5:302025-03-28T17:36:29+5:30
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेचं 'कुटुंब किर्रतन' हे नवीन नाटक लवकरच भेटीला येत आहे.

घरातल्या किरकिरीवर संकर्षण कऱ्हाडेचा रामबाण उपाय, म्हणाला- "नातं म्हटलं की..."
मराठी कलाविश्वातील संकर्षण कऱ्हाडे प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम करुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. संकर्षण अभिनेत्यासोबत उत्तम लेखकदेखील आहे. त्याचे सध्या रंगभूमीवर नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) आणि तू म्हणशील तसं ही दोन नाटके सुरू आहेत. नुकतेच त्याने एका नव्या नाटकाची घोषणा केली असून या नाटकाचे नाव आहे 'कुटुंब किर्रतन' (Kutumb Kirrtan). या नाटकाच्या निमित्ताने एका मुलाखतीत घरातल्या किरकिरीवर मत मांडलं आहे.
संकर्षण कऱ्हाडेने तारांगणला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबातील किरकिरीवर आपलं मत मांडलं. तो म्हणाला की, किरकिर करणारी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. मध्यंतरी जावेद अख्तर साहेब छान वाक्य म्हणाले होते की, त्या दोन माणसांपासून लांब रहा. जे प्रत्येक गोष्टीवर सहमत असतात आणि जे प्रत्येक गोष्टीवर असहमत असतात. त्याच्या मधलं काहीतरी साधा. त्याच्यामुळे नातं म्हटलं की किरकिर आली. त्या प्रवासात थोडासा टर्ब्युलन्स येतो पण थांबायचं कुठे ते कळलं पाहिजे.
''प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किर्रतन घडतंच असतं''
आमच्या नाटकामध्ये फार छान वाक्य आहे की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किर्रतन घडतंच असतं. महत्त्व किर्रतनाला दिलं तर कितीही चांगलं कुटुंब असू द्या ते झोडच वाटतं. महत्त्व कुटुंबाला दिलं की कितीही किर्रतन घडू द्या ते गोड वाटतं. महत्त्व कशाला द्यायचं, नात्याला दिलं तर भांडण गौण वाटतं आणि भांडणाला दिलं तर नातं गौण वाटतं, असे तो यावेळी म्हणाला.