‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडे पहिल्यांदाच दिसली कॉमेडी जॉनरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:14 PM2019-02-04T15:14:06+5:302019-02-04T15:16:50+5:30
‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच कॉमेडी सिनेमात दिसली आहे.
नवीन वर्षातला विनोदी सिनेमा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सिनेमात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांच्या मनोरंजक भूमिका आहेत.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच कॉमेडी सिनेमात दिसली आहे. त्यामुळे तिने या कॉमेडी सिनेमासाठी होकार कसा दिला आणि या सिनेमाचा एकंदरीत प्रवास याविषयी वाचकांना जाणून घेता येणार आहे.
कॉमेडी जॉनर पहिल्यांदाच साकारण्याविषयी विचारले असता, संस्कृतीने म्हटले की, “सुरुवातीला मी नर्वस होते. मला सिटकॉम आणि सिच्युएशनल कॉमेडी आवडते. पण मी कॉमेडी जॉनर कधी केला नव्हता, मला ते जमेल का असं त्यावेळी वाटायचं म्हणून सिनेमा स्विकारायचा की नाही इथून माझी सुरुवात होती. सिध्दार्थ जाधव आणि इतर सिनिअर कलाकार असल्यामुळे त्यांच्यासोबत केमिस्ट्री जमायला वेळ लागेल का असे विचार चालू होते. पण सेटवर गेल्यावर मला कम्फर्टेबल वाटलं. खरं तर, जेव्हा पात्रं आपण पूर्णपणे समजून घेतो तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी योग्यपणे जुळून येतात. माझी भूमिका साकाराताना, भूमिकेनुसार कॉमेडी पंचेचसाठी या सिनेमातील कलाकारांनी पण मला मदत केली.”
संस्कृतीने साकारलेल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, “मी यामध्ये तन्वी हे पात्रं साकारलं आहे जी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर असल्यामुळे मी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन सेटवर वावरत होती. प्रोफेशनल कॅमेरा हाताळण्याची, फोटो काढण्याची एक पध्दत असते, ती मी या निमित्ताने शिकले. सेटवर बरेच फोटोग्राफर्स होते त्यांनाही मी कॅमेराचे काही फंक्शन्स विचारले. स्क्रिनवर प्रोफेशनल फोटोग्राफर दिसावं आणि कॅमेरा हाताळण्यात कम्फर्ट आणि कॉन्फिडंट दिसण्याचा प्रयत्न मी केला.”
कॉमेडी जॉनरसाठी आलेली प्रतिक्रिया याविषयी खास स्पेशल गोष्ट शेअर करत संस्कृतीने म्हटले की, “माझ्या घरच्यांकडून ख-या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अजून पोहचायच्या आहेत. पण हेमांगी कवीने जेव्हा ट्रायल शो पाहिला होता आणि नंतर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिने माझं खूप कौतुक केलं. मी साकारलेल्या पात्राच्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात घेऊन हेमांगीने त्यासाठी मला दिलेली दाद माझ्यासाठी खूप खास आहे. हेमांगी कवी, जी स्वत: खूप उत्तम काम करते आणि कॉमेडी तर खूपच छान करते तिच्याकडून माझं कौतुक होणं माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे.”
पुढे अभिनेत्यांविषयी बोलताना म्हटले, “सौरभसोबत पूर्वी काम केलंय त्यामुळे या सिनेमात मी काम करावं असा कम्फर्ट मला तेव्हा मिळाला जेव्हा मला कळलं की यात सौरभही आहे. सौरभसोबत केमिस्ट्री जुळायला कठीण नव्हतं. आम्ही पूर्वीही काम केलंय आणि आम्ही खूप चांगले मित्र असल्यामुळे केमिस्ट्री ही आपसूक जुळणार होती. सिध्दार्थसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. सिध्दार्थ खूप सपोर्टिव्ह आहे.”
सिनेमाचे दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांचा हा पहिलाच सिनेमा आहे, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत तिने म्हटले, “तुमचं कास्टिंग जर बरोबर झालं असेल ना तर तुमची अर्धी फिल्म ही तुमच्या हातात असते. त्यांनी सिध्दार्थ, सौरभ यांना कास्ट करणं आणि अशा काही कलाकारांना कास्ट करणं ज्यांनी कॉमेडी फारशी केली नाही आहे. माझी ऍक्टिंग स्टाईल खूप नॅचरल आहे आणि त्यामुळे मला तेच टेन्शन होतं की कॉमेडीला कधी-कधी जास्त एनर्जी लागते. पण दिग्दर्शक प्रदीप सरांनी खूप सांभाळून घेतलं. त्यांनी माझ्या पध्दतीने मला अभिनय करु दिला आणि हळू-हळू कुठे, कसे एक्सप्रेशन्स कितपत दिले पाहिजे हे मला कळलं. सरांसाठी कलाकाराला काय वाटतं हे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे एकंदरीत माझा या सिनेमाचा अनुभव खूप छान होता.”