"मी गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण...", संतोष जुवेकरचा मोठा खुलासा
By कोमल खांबे | Updated: March 2, 2025 11:34 IST2025-03-02T11:34:11+5:302025-03-02T11:34:35+5:30
संतोषने रायाजी नव्हे तर गणोजी शिर्के या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण, त्याला ही निगेटिव्ह भूमिका साकारायची नव्हती.

"मी गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण...", संतोष जुवेकरचा मोठा खुलासा
विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सर्वत्र गाजत आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा ज्वलंत इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती शंभुराजेंची भूमिका साकारली आहे. या सिनेमात रायाजीची भूमिका साकारून मराठी अभिनेता संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. पण, संतोषने रायाजी नव्हे तर गणोजी शिर्के या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण, त्याला ही निगेटिव्ह भूमिका साकारायची नव्हती.
संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने नुकतीच न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितला.
'छावा' कादंबरी वाचताना व्यक्त केलेली इच्छा
"मी शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचली होती. ती कादंबरी वाचताना मी बोलून गेलो होतो की यावर जर सिनेमा झाला तर मला यात काम करायचं आहे. जेव्हा मला सिनेमाच्या ऑडिशनसाठी कॉल आला तेव्हा मी गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. यावर सिनेमा झाला तर मला कोणती तरी भूमिका मिळावी हे मी मॅनिफेस्ट केलं होतं".
गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी दिलेली ऑडिशन
"पण, ऑडिशन दिल्यानंतर मला गणोजी शिर्केंची भूमिका करायची नव्हती. मला वादाच्या भोवऱ्यात पडायचं नाही किंवा कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. पण, मी कादंबरी वाचली त्यामुळे मला जे माहीत होतं त्यामुळे मला हा रोल करायचा नव्हता. मी ऑडिशन दिलं पण माझं असं होतं सिलेक्शन नाही झालं तर बरं होईल. नंतर २-३ दिवसांनी मला प्रोडक्शनमधून फोन आला की लक्ष्मण सरांना तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही उद्या येऊ शकता का? मी त्यांना भेटायला गेलो. लक्ष्मण सर म्हणाले मी तुझं काम पाहिलंय. ऑडिशन पण मस्त झालंय. पण, तू गणोजी नको करूस. तू रायाजी करशील का? मी त्यांना लगेच होकार दिला. आपण जे मॅनिफेस्ट केलेलं असतं ते आपल्या पदरात पडतंच. ते फळ माझ्या पदरात पडलं".
'छावा' सिनेमात संतोषने रायाजीची भूमिका साकारली आहे. तर सारंग साठ्येने गणोजी शिर्केंची भूमिका साकारली आहे. सुव्रत जोशी या सिनेमात कान्होजी शिर्केंच्या भूमिकेत आहे. या सिनेमात आणखीही काही मराठी कलाकार झळकले आहेत.