"मी काहीच चुकीचं बोललो नाही", अक्षय खन्नाबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण, म्हणाला...
By कोमल खांबे | Updated: March 17, 2025 11:14 IST2025-03-17T11:14:24+5:302025-03-17T11:14:57+5:30
"लहानपणी आई सिनेमातल्या व्हिलनला शिव्या द्यायची...", अक्षय खन्नाबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर संतोष जुवेकर पुन्हा बरळला?

"मी काहीच चुकीचं बोललो नाही", अक्षय खन्नाबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण, म्हणाला...
विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने अक्षय खन्नाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. "छावाच्या संपूर्ण शूटिंगमध्ये मी अक्षय खन्नाशी बोललो नाही. मुघलांची पात्र साकारणाऱ्या कुठल्याच व्यक्तीशी मी बोललो नाही", असं वक्तव्य संतोषने केलं होतं. या वक्तव्यानंतर संतोषला ट्रोल करत अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. त्या वक्तव्यावर संतोषने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
संतोषने नुकतीच मुंबई तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अक्षय खन्नाचा मोठा फॅन असल्याचं म्हटलं. संतोष म्हणाला, "खरं तर या विषयावर मला बोलायचं नाही. लोक म्हणतात की काय सारवासारव करतो. आला मोठा शहाणपणा शिकवायला. माझ्यातल्या कलाकारावर संतोष जुवेकर हावी झाला. ज्याची महाराजांवर आपुलकी, आस्था आहे. मी कादंबरी वाचली आहे. त्यामुळे माझ्यावर कदाचित प्रभाव पडला असेल. जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली त्यापेक्षा जी पोहोचली नाही ती मला सांगायची आहे. तो राग फक्त त्या भूमिकेचा होता. कारण, अक्षय खन्नाचा मीदेखील तेवढाच फॅन आहे. ही सारवासारव नाहीये. पण, खरंच माझं प्रेम आहे. कारण, इतकं सुंदर त्या माणसाने काम केलंय ना की त्याचा राग यावा".
पुढे संतोष म्हणाला, "लहानपणी आपली आई किंवा आजी निळू फुले किंवा एखाद्या व्हिलनला शिव्या द्यायचे. की हा नालायक आहे. पण, ते त्या भूमिकेसाठी असायचं. त्या माणसाची ती पावती होती. पुरुष नाटकात नाना पाटेकरांना एका बाईने प्रयोग सुरू असताना चप्पल फेकून मारली होती. नानांनी ती चप्पल परत दिली नव्हती. ते म्हणाले होते की ते माझं अवॉर्ड आहे. मला वाटतं की हीदेखील अक्षय खन्नाच्या कामाची पावती आहे. की त्याने १०० टक्के देऊन ते पात्र उभं केलं. मी बोललो ते चुकीचं नाही बोललो. पण, ते चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं. यासाठी मला असं वाटतं की मी का बोललो. कारण, माझं म्हणणं लोकांनी वेगळ्या अर्थाने घेतलं. आपण कोणाचेही विचार बदलू शकत नाही. मारणारा हात आपण थांबवू शकतो बोलणारं तोंड नाही".