सौरभ गोखले पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:00 AM2019-01-29T08:00:00+5:302019-01-29T08:00:00+5:30

सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले या दोन हिरोंच्या आयुष्यात येणा-या पाच हिरोईन्स आणि त्यानंतर होणारी धमाल म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.

Saurabh gokhale first time playing comedy roll in sarv line vasaty aahe movie | सौरभ गोखले पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

सौरभ गोखले पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देसौरभ गोखले याने पहिल्यांदाच विनोदी पात्रं साकारलं आहेही हिरोईन्सच्या भूमिकेंमध्ये गंमत आहे.

सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले या दोन हिरोंच्या आयुष्यात येणा-या पाच हिरोईन्स आणि त्यानंतर होणारी धमाल म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या पाच हिरोईन्सनी केलेली धमाल आणि त्यांच्या सोबतीला महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे यांच्या भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

वेगवेगळ्या भूमिका साकारणारा या सिनेमाचा लीड हिरो सौरभ गोखले याने पहिल्यांदाच विनोदी पात्रं साकारलं आहे. याविषयी सांगताना सौरभने म्हटले की, “आतापर्यंत मी कधीच विनोदी भूमिका केली नव्हती. ‘राधा ही बावरी’ मालिकेतील सौरभच्या भूमिकेला थोडीशी विनोदी शेड होती. पण संपूर्ण विनोदी अभिनय केलेला हा माझा पहिलाच सिनेमा. माझ्या बाबतीत घडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे माझी कोणतीच भूमिका ही रिपीट झालेली नाही. आतापर्यंत मला दरवेळी वेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या. त्यामुळे या विनोदी सिनेमासाठी मला विचारण्यात आले तेव्हा मी होकार दिला. यामागे आणखी काही खास कारणं म्हणजे गणेश पंडीत यांनी या सिनेमाची लिहिलेली कथा आणि सह-कलाकार म्हणून सिध्दार्थची साथ.  विनोदाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखले जाते त्याच्यासोबत काम करायला मिळणार यामुळे मी खूष होतो आणि सिध्दार्थ असल्यामुळे मी रिलॅक्स झालो तसेच त्याच्याकडून शिकायलाही मिळाले.”

सौरभने साकारलेला ‘समीर’ हा कसा आहे याचे वर्णन करुन सांगताना सौरभने कथेविषयी देखील अंदाज दिला आहे. “समीर हा साधा, सरळ, सज्जन पण घाबरट असा मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे. लोकांमध्ये फारसा मिसळत नाही आणि मुलींशी तर बोलायला पण घाबरतो. त्याच्या लग्नाचं वय उलटून जात असल्यामुळे त्याचे आई-वडील एका गुरुकडे जातात, तेव्हा ते समीरचं लव्ह मॅरेज होणार आहे असे भाकीत करतात. हे ऐकताच समीरला हे अशक्य वाटतं. या प्रसंगात समीरला त्याचा मित्र बाब्याची मदत मिळते. बाब्या हा एकदम डॅशिंग आणि मुली पटवण्यात एक्सपर्ट असतो. बाब्याच्या टिप्सनुसार समीर मुलींशी बोलायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये हळू-हळू बदल व्हायला लागतात. पुढे त्याच्या आयुष्यात येणा-या मुली आणि त्या मुलींमुळे उडणारा गोंधळ आणि एकंदरीत होणारी धमाल म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.

सौरभच्या मते, “एकाच सिनेमात पाच हिरोईन्स हा या सिनेमाचा प्लस पाँईट आहे. मेल किंवा फिमेल ओरिएण्टेड सिनेमे बनतात. पण हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. प्रेक्षकांना प्रत्येक सीनमध्ये विविधता पाहायला मिळेल. पाचही हिरोईन्सच्या भूमिकेंमध्ये गंमत आहे. नीथा, संस्कृती, स्मिता, हेमांगी यांसोबत मी पूर्वी काम केलं होतं त्यामुळे एक कम्फर्ट झोन होता.”

‘समीर’च्या पात्राची आणखी एक खासियत म्हणजे या सिनेमात समीरचे तीन लूक्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक अगदी साधा-भोळा दिसणारा, नंतर त्याच्या आयुष्यात एक मुलगी आल्यावर त्याच्यामध्ये झालेले बदल आणि तिसरा लूक म्हणजे ‘एकदम ट्रान्सफॉर्मेशन’. समीरची हळू-हळू बदलत जाणारी पर्सनॅलिटी  सीन्समधून उलगडत आहे आणि प्रेक्षकांना कथेनुसार त्याच्यामध्ये होणारा पॉझिटिव्ह बदल नक्कीच आवडेल, असा सौरभचा विश्वास आहे.
 

Web Title: Saurabh gokhale first time playing comedy roll in sarv line vasaty aahe movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.