‘सविता दामोदर परांजपे’ थरारक तरीही रंजक अनुभव : स्वप्ना वाघमारे-जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:20 PM2018-08-27T17:20:24+5:302018-08-28T06:30:00+5:30
आजवर अनेक मालिकांसोबत आशयघन सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांचा ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
आजवर अनेक मालिकांसोबत आशयघन सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांचा ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाने त्या काळातील प्रेक्षकांचा थरकाप उडवला होता. या सिनेमातही प्रेक्षकांना थरार आणि मनोरंजनाचा अद्भुत संगम पहायला मिळणार असल्याचं स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात.
‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती अभिनेता जॉन अब्राहम यांनी केली आहे. या सिनेमाबाबत स्वप्ना वाघमारे-जोशी म्हणाल्या की, एका गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनवताना अचूक माध्यमांतर करण्याचं आव्हान होतंच, त्यासोबतच नाटकाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता तो विषय आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही करायचं होतं. शिरीष लाटकर यांनी लिहिलेल्या पटकथेमुळे हे काम बऱ्याच अंशी सोपं झालं. जॉनसारखा हिंदीतील मोठा अभिनेता ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचा निर्माता बनल्याने या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.‘सविता दामोदर परांजपे’ ची संपूर्ण टिम त्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचं स्वप्ना यांचं म्हणणं आहे.
‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या माध्यमातून आणखी एक नवा चेहरा मराठी सिनेसृष्टीत दाखल होत आहे. ज्येष्ठ लेखक अभिनेते कै. मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती ने या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तृप्तीसोबतच इतर कलाकारांच्या अभिनयाबाबत स्वप्ना वाघमारे-जोशी म्हणाल्या की, खरं तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा इतक्या सोप्या पद्धतीने बनवणं तृप्तीमुळेच शक्य झालं. तिच्या ओळखीमुळेच आमच्या टिममध्ये जॉनची एंट्री झाली. सुबोध आणि तृप्ती यांच्या जोडीला राकेश बापटने सुरेख साथ दिल्याने एक थरारक सिनेमा सादर करण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं.
‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ यांची प्रस्तुती असून, योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून, लेखन व संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. छायांकन प्रसाद भेंडे यांनी केलं असून, क्षितिजा खंडागळे यांनी संकलन केलं आहे. सुबोध, तृप्ती आणि राकेश यांच्या जोडीला या सिनेमात अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘सविता दामोदर परांजपे’ ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.