लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:02 PM2024-11-19T13:02:12+5:302024-11-19T13:02:40+5:30
सविता मालपेकर यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत मुलीबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. डॉक्टरांनी सविता मालपेकर यांच्या मुलीला मृत घोषित केलं होतं. पण, स्वामींच्या कृपेमुळे दहा दिवसांनी त्यांची मुलगी कोमामधून बाहेर आली.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेली कित्येक दशकं त्या सिनेसृष्टीत काम करत आहेत. सविता मालपेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. अभिनय कारकीर्दीतील अनेक किस्से सांगत सविता मालपेकर यांनी या मुलाखतीला रंगत आणली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबाबतही भाष्य केलं.
सविता मालपेकर यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत मुलीबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी त्यांना आलेला स्वामी अनुभवही सांगितला. डॉक्टरांनी सविता मालपेकर यांच्या मुलीला मृत घोषित केलं होतं. तिला मॅनिनजिटीस हा आजार झाला होता. पण, स्वामींच्या कृपेमुळे दहा दिवसांनी त्यांची मुलगी कोमामधून बाहेर आली. हा प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "२००३च्या जून महिन्यात माझी मुलगी लंडनला शिकायला गेली होती. त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी स्वामींच्या मठात बसले होते. एकुलती एक मुलगी लंडनला असल्याने काळजी वाटायची. तेव्हा खूप काही मोठं घडणारे अशी हिंट मला स्वामींनी दिली. आणि १३ ऑक्टोबर २००३...आदल्या दिवशीच माझं मुलीबरोबर बोलणं झालं होतं. मला डबल टायफाइड झाला होता आणि शुगर असल्याने तिला काळजी वाटत होती. दुसऱ्या दिवशी मला लंडनहून मुलीच्या कॉलेजमधून फोन आला की केतकी कोमामध्ये गेलीय आणि व्हेंटिलेटरवर आहे".
"त्याच्याआधीच माझ्या सासूबाईंचं निधन झालेलं. पण, आम्ही तिला कळवलं नव्हतं. सासूबाईंच्या निधनामुळे सासरे पण गावी होते. आणि त्यांना सोडायला माझे मिस्टर गेले होते. त्यामुळे घरात मी एकटीच होते. फोन आल्यानंतर मला काही कळतंच नव्हतं. माझी बहीण माझ्यासोबत होती. ती सगळ्यांना फोन करायचा प्रयत्न करत होती. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की तुमची मुलगी गेली आहे. आणि तुम्ही तिला घेऊन जा. मला काहीच सांगितलं नव्हतं. त्या दिवशी मी स्वामींच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना म्हटलं की स्वामी माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलंय. तिला तारा, मारा जे काही करायचं ते तुम्ही करायचं. मी तुमच्यावर सगळं सोपवलेलं आहे. मी देव पाण्यात ठेवून जप करत होते. लंडनमधली काही ओळखीची माणसं तिथे जात होती. तिच्याबरोबर शिकत असलेले मित्र तिथे होते. माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की असं होणं शक्यच नाही. व्हेंटिलेटरवर आहे तर आपण बघू. आणि दहाव्या दिवशी लंडनहून फोन आला की केतकी कोमामधून बाहेर आली", असंही त्यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, "तिला मॅनिनजिटीस झाला होता. ज्यामध्ये कोणीही वाचत नाही. तिथे समुद्राच्या बाजूला तिचं हॉस्टेल होतं. त्यामुळे बॅक्टेरियामुळे वगैरे तिला हे असं झालं होतं. ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय हे तिला कळलं होतं. संध्याकाळी तिचे मित्रमैत्रिणी तिला बोलवायला गेले होते. तेव्हा तिने त्यांना मला दिसत नाहीये, ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय, अॅम्बुलन्स बोलवा, असं सांगितलं. तिने आल्यावर सांगितलं की आई अॅम्ब्युलन्समध्ये बसल्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही. डॉक्टरही हेच म्हणाले की हा चमत्कार आहे. प्रत्येक वेळेला स्वामींनी मला दणका दिलेला आहे. पण, तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तर ते म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी...त्यानंतर तिचा पाय थोडा अधू झाला होता. ती उडत चालायची. पण, तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचंच होतं. हट्टाने तिकडे ती गेली. आणि महिन्याभरानंतर परत पहाटे असाच फोन आला की केतकीला अॅडमिट केलं आहे. तिला कमरेखालून चालताच येत नव्हतं. ती डॉक्टरांच्या समोर होती आणि खूप रडत होती. तिला व्हिलचेअरवरुन उठता येत नव्हतं. मणक्यात इंजेक्शन देत होते. त्यामुळे तिला खूप त्रास होत होता. मी तिला म्हटलं केतकी स्वामींचं नाव घे आणि जोरात दोन्ही पाय झटक...आणि ती उठून उभी राहिली".