सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:15 AM2024-04-12T10:15:38+5:302024-04-12T10:17:57+5:30
सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
दिग्गज अभिनेता सयाजी शिंदे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टी गाजवली. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती मिळत आहे. सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. छातीत दुखू लागल्याने ते गुरुवारी(११ एप्रिल) रुग्णालयात दाखल झाले होते. साताऱ्यात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
"सयाजी शिंदे यांना गेल्या आठवड्यात अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी काही रुटीन चाचण्या करून घेतल्या होत्या. 2D इकोमध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी असल्याचं जाणवलं. काल त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. तेव्हा हृदयाच्या ३ पैकी २ रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या. उजव्या रक्तवाहिन्याच्या तोंडाकडे ९९ टक्के ब्लॉक आढळला. शरीराकडून त्यांना वेगळे मेसेज मिळत होते. त्यामुळे त्यांनी तातडीने तपासण्या करून घेतल्या. या तपासण्यात जो दोष आढळला तो आम्ही तातडीने दुरूस्त केला. आता ते पूर्णपणे बरे आहेत," असं डॉ. सोमनाथ साबळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
सयाजी शिंदे गेल्या कित्येक दशकांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा तिन्ही सिनेसृष्टीत त्यांनी काम केलं आहे. मराठीबरोबरच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्येही त्यांनी काम केलं आहे. अभिनयाबरोबरच ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत त्यांनी वृक्षारोपण अभिनयाचं काम सुरू केलं आहे.