सायली संजीवचा बांधला जाणार लग्नाचा ‘बस्ता’, ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:10 PM2021-01-25T18:10:20+5:302021-01-25T18:11:38+5:30

‘बस्ता’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Sayalee Sanjeev's wedding bag to be tied, trailer released | सायली संजीवचा बांधला जाणार लग्नाचा ‘बस्ता’, ट्रेलर प्रदर्शित

सायली संजीवचा बांधला जाणार लग्नाचा ‘बस्ता’, ट्रेलर प्रदर्शित

googlenewsNext

काळ जरी बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा ज्याच्यामुळे नवरी मुलीच्या वडिलांच्या जीवाला घोर लागतो, मानपान- नातेवाईकांची पसंती यांच्या अनुषंगाने विचार करुन आपण कुठे कमी पडू नये याचा पुरेपूर प्रयत्न मुलीच्या वडिलांचा चालू असतो. बस्त्याच्या दरम्यान काहीही घडू शकते, जुळलेले लग्न मोडू ही शकते इतका नाजूक तो क्षण असतो. बस्त्याच्या निमित्ताने अशीच एक भावूक पण मजेदार गोष्ट या मराठी सिनेमातून मांडली जाणार आहे.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स प्रस्तुत, सुनिल राजाराम फडतरे निर्मित आणि तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सायली संजीव, सुहास पळशीकर, शुभांगी गोखले, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, प्राजक्ता हनमगर, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाट आदी कलाकारांनी त्यांच्या सहज-सुंदर अभिनयाने कथेत रंगत आणली आहे.

या सिनेमाची कथा लग्नसोहळ्या भोवतीच फिरते पण यातून अधोरेखित होते वडील- मुलीचे नाते आणि मुलीच्या सुखासाठी शेतकरी वडीलांची चाललेली धडपड. सायली संजीवने यामध्ये ‘स्वाती’ नावाचं पात्रं साकारलं आहे तर सुहास पळशीकर यांनी आळते गावचे कष्टाळू शेतकरी ‘नामदेवराव पवार’ हे पात्रं साकारलं आहे. स्वातीला नोकरदार नवरा पाहिजे असा नामदेवरावांनी ठरवलंय. काही स्थळं बघितल्यावर सरकारी नोकरीत कार्यरत असणा-या विकास चौधरीला (सुरज पवार) स्वातीने पसंत केलंय. मात्र लग्न थाटामाटात झालं पाहिजे हा मुलाच्या मंडळींचा हट्ट नामदेवराव यांनी केवळ आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे या त्यांच्या स्वप्नाखातर पूर्ण करण्याचा शब्द देतात आणि त्यासाठी धडपडत असतात. लग्नाची बोलणी झाल्यावर लग्नाच्या कामाची सुरुवात बस्ता बांधण्यापासून होते... बस्त्यासाठी अनेक अडचणी येतात, काही मजेदार किस्से घडतात, भावूक क्षण अनुभवयाला मिळतात. मग संपूर्ण कथा ही बस्त्या भोवती फिरते आणि अखेरीस काय होतं हे चित्रपट पाहिल्यावर समजेल.


अरविंद जगताप लिखित या सिनेमातील गाण्यांचे गीतलेखन मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी केले आहे तर, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. एका लग्नाच्या बस्त्यानिमित्त घडणारी गोष्ट ‘बस्ता’ हा सिनेमा २९ जानेवारीपासून फक्त झीप्लेक्सवर पहायला मिळेल.

Web Title: Sayalee Sanjeev's wedding bag to be tied, trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.