अभिनयानंतर सायली संजीव करणार ही गोष्ट, लवकरच दिसणार तिची दुसरी इनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 04:00 PM2019-08-23T16:00:39+5:302019-08-23T16:03:04+5:30
शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.
अभिनेत्री सायली संजीवनं राजकारणात येण्याचा निर्धार केला आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसली तरी राजकारणाची आवड असल्याचं सायली संजीव सांगते. “कुणीतरी येईल आणि आपल्या समाजात तो बदल घडवून आणेल असं कशासाठी? त्यापेक्षा तुम्ही स्वतःच बदलांसाठी प्रयत्न करायला हवेत” असं ठाम आणि परखड मत तिने मांडले आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय बदल घडवून आणणं आवश्यक आहे हे आपल्याला माहित असतं. जर हे आपल्याला माहित नसेल आणि आपण ते करू शकत नसणार तर कुणाकडे बोट दाखवण्याचा आपल्याला अधिकार नाही असंही सायलीने म्हटलंय.
आपण पुढाकार घेतला नाही तर घराणेशाही कशी संपणार?, राजकारणात सुशिक्षित चेहरे कधी मिळणार असे प्रश्नही तिने उपस्थित केले आहेत. त्यामुळेच स्वतःपासून याची सुरूवात करण्यासाठी राजकारणात येणार असल्याचे सायली संजीवने म्हटले आहे. छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.
शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झालीय. गौरी म्हणून आजही रसिक ओळखत असून त्यांच्या विश्वासाला तसंच प्रेमाला तडा जाऊ देणार नाही असंही तिने सांगितले आहे.