मन्या-पप्याच्या ‘दोस्तीचा घाट’रूपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:46 AM2017-11-15T11:46:04+5:302017-11-15T17:16:04+5:30
१४ नोव्हेंबरला बालदिन साजरा होताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, खरंच आजच्या मुलांचे 'बालपण' जपले जाते का? लहान मुलांच्या ...
निरागसतेचं प्रतिनिधीत्व करणारी ही कथा मन्या व पप्या या दोन जिवलग मित्रांची आहे. ‘अवताराची गोष्ट’, ‘रांजण’ यासारख्या चित्रपटांमधून नावारूपाला आलेल्या यश कुलकर्णीने मन्या ही व्यक्तिरेखा साकारली असून त्याच्या मित्राची म्हणजे पप्याची भूमिका दत्तात्रय धर्मे याने साकारली आहे. अडचणीत असलेल्या आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करीत स्वत:ला घडवू पाहणाऱ्या मुलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्याचा आनंद या दोघांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
मन्या या व्यक्तिरेखेसाठी यशसारखा कलाकार अपेक्षित असल्याने त्याची निवड केल्याचे दिग्दर्शक राज गोरडे सांगतात तर मन्याच्या मित्राची म्हणजेच पप्प्याची भूमिका साकारण्यासाठी हवा असलेला मुलगा मिळत नव्हता. एके दिवशी इंद्रायणीच्या घाटावर फिरत असताना एक माऊली आपल्या मुलाला घेऊन राज गोरडे यांच्याकडे आली. “काहीही करा पण माझ्या मुलाला चित्रपटात घ्या”, अशा आर्त स्वरात हात जोडून ती राजकडे विनवणी करू लागली. विनवणी करता करता त्या माऊलीचे डोळे अश्रूंनी पाणावले. हे राज यांना पाहावलं नाही आणि त्यांनी पप्प्याच्या भूमिकेसाठी दत्तात्रयला घेण्याचं निश्चित केलं. तो ही भूमिका करू शकेल का? याबाबत साशंकता होती पण दत्तात्रयने या भूमिकेला चांगला न्याय दिल्याचं राज गोरडे मान्य करतात.
मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’ मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील प्रोडक्श्न मॅनेजर आहेत.१५ डिसेंबरला ‘घाट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.