​‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने होणार हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:49 AM2017-09-08T11:49:53+5:302017-09-08T17:19:53+5:30

'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी पाच वर्षापूर्वी हाती घेतला होता. मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ...

The second flowering of herbium will be performed by the play 'Husband Gaan Gan Kathewadi' | ​‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने होणार हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात

​‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने होणार हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात

googlenewsNext
'
;सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी पाच वर्षापूर्वी हाती घेतला होता. मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ठरलेली आणि गाजलेली काही चांगली नाटके 'हर्बेरियम' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पाहाता यावी, या उद्देशाने सुनील बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचा ‘हर्बेरियम’ उपक्रम २०१२ मध्ये संपल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे नवीन काय घेऊन येणार याकडे नाट्यरसिकांचे डोळे लागले होते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही उत्सुकता संपणार असून 'हर्बेरियम'च्या दुसऱ्या नव्या पर्वाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या दुसऱ्या पर्वाची घोषणा निर्माते सुनील बर्वे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली. बॅकस्टेज आर्टिस्ट मधू दळवी यांच्या फोटोला पुष्पहार घालत ही पत्रकार परिषद सुरू करण्यात आली. माझ्या आजवरच्या यशात प्रेक्षकांच्या प्रेमाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत ‘हर्बेरियम’चे दुसरे पर्व मी आणले आहे, असे सुनील बर्वे यांनी यावेळी सांगितले. ‘हर्बेरियम’ या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला लाभलेल्या उत्तम यशानंतर दुसऱ्या पर्वाचे स्वागत ही नाट्यरसिक जोरदार करतील आणि हे पर्वही नाट्यरसिकांना स्मरणरंजनाचा आनंद देईल असा विश्वास सुनील बर्वे यांनी व्यक्त केला. ‘हर्बेरियम’ चा उपक्रम राबवताना तो अभ्यासपूर्वक राबवायला हवा यासाठी सुनील बर्वे आग्रही होते. त्यासाठी परदेशी जाऊन जागतिक रंगभूमीचा आढावा घेतल्यानंतर आपला दृष्टिकोन बदलला असे सांगत ‘हर्बेरियम’च्या उपक्रमात याचा फायदा झाल्याचे सुनील बर्वे आवर्जून सांगतात. चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे आणि कलाकार मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखिल रत्नपारखी, धनंजय म्हसकर आणि सिद्धेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
 ‘हर्बेरियम’ उपक्रमाअंतर्गत सादर झालेल्या जुन्या नाटकांचे रसिक प्रेक्षकांनी भरभरुन स्वागत केले होते. या पार्श्वभूमीवर ‘हर्बेरियम' पुन्हा एकदा रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. या पर्वातही पाच नाटकं असून विजय केंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे या मातब्बर दिग्दर्शकांची नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात या नाटकांचे प्रयोग रंगतील.
‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखिल रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर आणि सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका करणार आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असणार आहे. संगीत राहुल रानडे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

Web Title: The second flowering of herbium will be performed by the play 'Husband Gaan Gan Kathewadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.