अखेर प्रतीक्षा संपली ! स्वप्निल जोशीच्या 'समांतर'चा दुसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:42 PM2020-12-12T14:42:51+5:302020-12-12T15:28:24+5:30
या वेबसिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरू आहे.
‘समांतर’ वेबसिरीजच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरू आहे. जगभरातील प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते.
‘समांतर’ या वेबसिरीजच्या माध्यमातून अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने वेब सिरीज क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’च्या माध्यमातून ‘ओव्हर-द-टॉप’ व्यासपिठावरून ही मालिका प्रसारित झाली. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो.
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या दोघांची मालिका म्हणूनही ‘समांतर’बद्दल रसिकांमध्ये कुतूहल आहे.