'आरॉन'ची आंतरराष्ट्रीय 'कान' चित्रपट महोत्सवासाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:57 PM2019-04-10T18:57:39+5:302019-04-10T18:59:04+5:30
जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’आरॉन’ ची वर्णी लागली आहे.
जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’आरॉन’ ची वर्णी लागली आहे. या प्रतिष्ठित महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये सेन्सॉरसंमत झालेल्या तीन चित्रपटांची घोषणा केली असून दिठी, बंदिशाला व आरॉन हे चित्रपट अधिकृतरीत्या फ्रांसमधील ‘कान’ चित्रपट महोत्सवाचा भाग होतील.
‘आमच्या आरॉन ची निवड एवढ्या मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी झाली.त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात महत्वाचा फिल्म फेस्टिवल समजला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपटप्रेमी तिथे येत असतात. मराठी चित्रपटांना परदेशी व खासकरून युरोपमधील बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. आम्ही आरॉन चे मार्केटिंग उत्तम प्रकारे करण्याचे ठरविले आहे. आमच्या चित्रपटाबरोबरच मराठी चित्रपटांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आरॉनचे दोन खेळ आयोजित करण्यात आले असून त्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायासमोर आम्ही आरॉनचे तगडा मार्केटिंग करण्याचा मानस बाळगून आहोत’ अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली.
शशांक केतकर व नेहा जोशी हे दोघे पुणेकर पॅरिसमध्ये चित्रित झालेल्या ‘आरॉन’ चित्रपटामध्ये प्रथमच एकत्र दिसले व त्यांना बालकलाकार अथर्व पाध्ये याने उत्तम साथ दिली. जिएनपी फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे.
आंतरराष्ट्रीय ‘कान’ चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेला मराठी चित्रपट ‘आरॉन’ फ्रांसमध्ये कशी कामगिरी करतो याकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी डोळे लावून असेल.