"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:15 IST2024-11-22T14:14:44+5:302024-11-22T14:15:23+5:30
"साऊथ इंडस्ट्रीत सगळे एकमेकांचे मित्र", शरद केळकरने सांगितला मराठी आणि साऊथमधला मोठा फरक

"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा शरद केळकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी, साऊथ आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये त्याने काम केलं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेला शरद रानटी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी तो मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं. मराठी इंडस्ट्रीला एकत्र येण्याची गरज असल्याचंही शरद केळकर म्हणाला.
शरद केळकरने नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मराठी सिनेमा आणि इंडस्ट्रीबद्दल भाष्य करताना तो म्हणाला, "तमिळमध्येही चांगले कंटेट असलेले सिनेमे चालत नव्हते. किंवा ते वाढत नव्हते. तेव्हा मग त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्टार क्रिएट करण्याचा निर्णय घेतला. यात संपू्र्ण इंडस्ट्रीचं योगदान असतं. हे पाच स्टार आपल्याला उभे करायचे आहेत. ज्यांना बघायला लोक येतील. तेलुगुमध्ये एनटीआर सरांपासून ते स्टारडम आहे. पण, मल्याळममध्ये नव्हतं. कलाकार खूप चांगले होते. पण, त्यांना स्टार बनवायची गरज होती. मग त्यांना हिरो बनवायचं हा विचार करूनच सिनेमे बनवले गेले. मोहनलाल सरांची पर्सनालिटी बघितली तर त्यांची सिक्स पॅक्स बॉडी वगैरे नाही. पण, अभिनेता चांगला आहे. आणि त्यांना त्या पद्धतीने दाखवलं गेलं. आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे. एखाद्यामध्ये तुम्हाला चांगला अभिनेता दिसतोय, तर त्याला स्टारडम मिळालं पाहिजे की नाही? हा विचार केला पाहिजे. बहुतांश लोकांना स्टारडम मिळू नये असं वाटतं. माझ्या लिस्टमध्ये अशी मुलं आहेत. जर मला संधी मिळाली तर मी त्या सगळ्यांना मराठी इंडस्ट्रीचा स्टार बनवेन. ते इंडस्ट्रीसाठी पण बरं होईल. कारण, इंडस्ट्री तिथेच अडकली आहे".
"रितेश देशमुख स्टार आहे. त्यांना बघायला लोक येतात. लय भारी कंटेटच्या दृष्टीने ग्रेट सिनेमा नाही. पण, ज्या पद्धतीने निशिकांत सरांनी त्यांना प्रेझेंट केलं. ते महत्त्वाचं आहे. वर्षाला ५-६ सिनेमे हिट दिले, तरच इंडस्ट्री मोठी होईल. वर्षाला २०० सिनेमे करायची गरज नाही. लोकांची तेवढी बघायची क्षमतादेखील नाही. वर्षाला १०० सिनेमे करा. यासाठी इंडस्ट्रीने एकत्र येण्याची गरज आहे. साऊथमध्ये सगळे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्या डेट्स पण कलाकार नाही तर निर्माते ठरवतात. दोन साऊथ सिनेमे एकाच दिवशी कधीच प्रदर्शित केले जात नाहीत. आपण मात्र एकाच दिवशी ३-४ सिनेमे प्रदर्शित करतो. त्यात हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले तर काय होईल, अशी पण भीती असते. पण, सरकार सपोर्ट करतं. पण, तुम्ही चांगले सिनेमे बनवले पाहिजेत. मार्केटिंग केलं पाहिजे. मगच थिएटर मिळतील", असंही पुढे शरद म्हणाला.
'रानटी' चित्रपटात शरद केळकरसह (Sharad Kelkar) संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, छाया कदम, जयवंत वाडकर, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, शान्वी श्रीवास्तव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. पुनीत बालन स्टुडिओने याची निर्मिती केली आहे. तर समित कक्कड यांचं दिग्दर्शन आहे. २२ नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.