‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांना मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा, मराठी सिनेमांची प्रगती पाहून भारावले बिहारी बाबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:23 AM2018-06-30T11:23:12+5:302018-06-30T11:24:24+5:30
भोजपुरी सिनेमात काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
बॉलीवूडचे शॉटगन सिन्हा म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा सध्या राजकारणाच्या मंचावर आपल्या रिअल संवादांनी लक्ष वेधून घेत आहेत. सामाजिक कार्यातही ते तितकेच सक्रीय आहेत. मात्र रुपेरी पडद्यावर गेल्या काही वर्षात शत्रुघ्न सिन्हा यांचं रसिकांना दर्शन झालेले नाही. आपला जादूई अंदाज आणि तितकीच प्रभावी डायलॉग डिलिव्हरी यामुळे बॉलीवूडचे शॉटगन सिन्हा रसिकांचे फेव्हरेट आहेत. त्यामुळेच त्यांच्या सिनेमांची रसिकांना प्रतीक्षा असते. ते रुपेरी पडद्यावर कधी परतणार याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे. त्याच्या या फॅन्सची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हं आहेत. लवकरच शॉटगन सिन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत. इतकंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांना मराठी सिनेमात काम करण्याचीही इच्छा आहे. एखादी चांगली स्क्रीप्ट आली तर पहिलं प्राधान्य मराठी सिनेमालाच देऊ असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. मराठी सिनेमांची प्रगती पाहून बिहारी बाबू भारावले आहेत. एकेकाळी हिंदी सिनेमांची बंगाली, तेलुगू आणि तमिळ सिनेमांशी स्पर्धा होत असे. मात्र आता काळ बदलला आहे. मराठीत दर्जेदार सिनेमा येत असून ते हिंदी सिनेमांना टक्कर देत आहेत असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. माधुरी दीक्षितही मराठी सिनेमात झळकली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चांगली संधी मिळाल्यास मराठी सिनेमात काम करायला नक्की आवडेल असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. प्रादेशिक सिनेमा चांगली कामगिरी करत असल्याचेही ते म्हणालेत. यावेळी त्यांनी भोजपुरी सिनेमांचं कौतुक केलं. मात्र भोजपुरी सिनेमात काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच बॉलीवुडची रज्जो अर्थात सोनाक्षी सिन्हाने पॉलिटिक्सला ना म्हटलंय.. वडिल शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात येणार का यावर विचारलं असता तिनं हे स्पष्ट केलंय.तसेच २०१२ साली आलेला ‘राऊडी राठोड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. लवकरच या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येतोय. अलीकडे अक्षयने या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली. आता या सीक्वलबाबत एक नवा खुलासाही झाला आहे. तो म्हणजे, यात अक्षयची हिरोईन म्हणून सोनाक्षी नसणार आहे. सीक्वलमध्ये एखाद्या नव्या हिरोईनला संधी द्यावी, असे निर्मात्याचे म्हणणे असल्याचे समजतंय.‘राऊडी राठोड2’ हा चित्रपट ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोड्यूस करताहेत. अर्थात सोनाक्षीला चित्रपटात न घेण्याबाबत अद्याप भन्साळींनी काहीही उघडपणे सांगितलेले नाही. तूर्तास ‘राऊडी राठोड2’च्या तयारी जोरात आहेत. लवकरच याची फायनल स्टारकास्ट जाहीर होईल. ‘बाहुबली’चे लेखक के व्ही विजेन्द्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.