अभिमानास्पद! 'शेर शिवराज'चा जगभरात डंका, परदेशात १०० शोज हाऊसफुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:58 PM2022-05-06T13:58:00+5:302022-05-06T14:06:29+5:30
तिसऱ्या आठवड्यातही 'शेर शिवराज'ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे. भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला आहे.
लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही 'शेर शिवराज'चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवडयांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही 'शेर शिवराज'ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे.
'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड'नंतर 'शेर शिवराज'च्या रूपात 'शिवराज अष्टक' या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. 'शेर शिवराज' चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, 'शेर शिवराज'च्या टिमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचं सांगणारे हे आकडे आहेत. टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटींग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 'शेर शिवराज' पाहिला जात आहे. यात युएसएमधील २०, जर्मनीतील १०, दुबईमधील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे.
तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या 'शेर शिवराज' चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. 'शेर शिवराज' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक सेंटरमध्ये शोजची संख्या वाढवावी लागली. तरीही प्रेक्षकांना तिकीट्स अपुऱ्या पडल्याचे चित्रपट अनेक ठिकाणी पहायला मिळाले. चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे.