धक्कादायक!, अभिनेते भारत जाधवच्या नावाचा वापर करून केली जातेय फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:07 PM2021-09-27T12:07:45+5:302021-09-27T12:08:13+5:30
नुकताच घडलेला एका धक्कादायक प्रकार भरत जाधव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधवने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्यांचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. नुकताच घडलेला एका धक्कादायक प्रकार भरत जाधव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे. भारत जाधवच्या नावाचा वापर करून सिनेमात काम देतो म्हणून ऑडिशन घेत आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर ऑडिशन घेऊन त्या ऑडिशनमध्ये तुमचे सिलेक्शन झाले आहे आणि फोटोशूटसाठी काही रक्कम देखील नवोदित कलाकारांकडून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अभिनेता भरत जाधव याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, काल एका व्यक्तीचा मेसेज आला की "तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजेंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली."
मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचे असे कुठेही ऑडिशन सुरू नाही आहे. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, असे भरत जाधवने या पोस्टमध्ये सांगितले.
अभिनेता भरत जाधवने शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारापासून त्याच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याची ऑल द बेस्ट ही एकांकिका खूप गाजली. यावर आधारित असलेल्या ऑल द बेस्ट या नाटकाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सही रे सही यांसारखी अनेक सुपरहिट नाटकात त्याने काम केले. याशिवाय भरत जाधवचे मुक्काम पोस्ट लंडन, खतरनाक, गलगले निघाले, जत्रा आणि नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असे अनेक चित्रपटही खूप हिट ठरले.