जेव्हा निळू फुलेंसाठी थांबलं होतं Amitabh Bachchan यांच्या 'Coolie' चित्रपटाचं शूटिंग, काय आहे 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 01:55 PM2024-06-30T13:55:36+5:302024-06-30T14:00:45+5:30
तुम्हाला माहितेय का निळू फुलेंनी ''Coolie'' चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांना ताटकळत ठेवण्याचा पराक्रम केला होता.
मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले. पण त्यातल्या काही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके निळू फुले. आपल्या करारी आवाज व दमदार अभिनयाने निळू फुलेंनी फक्त मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. पण, तुम्हाला माहितेय का निळू फुलेंनी ''Coolie'' चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांना ताटकळत ठेवण्याचा पराक्रम केला होता.
अमिताभ बच्चन यांच्या नावाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ''Coolie''. हा चित्रपट तयार होत असताना अनेक अडचणी येत होत्या. शुटिंगदरम्यान अमिताभ यांना पुनित इस्सर यांच्याकडून दुखापत झाली. त्यामुळे बिग बी यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास २०० रक्तदात्यांनी ६० रक्ताच्या बाटल्या अमिताभ यांच्यासाठी दिल्या होत्या. यातून आमिताभ हे लवकरच बरे झाले. पण, यादरम्यानच्या काळात सिनेमाचं शुटिंग थांबवावं लागलं होतं.
अमिताभ जखमी होण्यापुर्वी निळू फुले आणि बिग बींचे काही शूट झालं होतं. आमिताभ जखमी झाल्यानंतर पुन्हा सिनेमाचं शुटिंग कधी सुरू होईल, याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे निळू फुलेंनी नवीन नाटकाच्या तालमीला सुरुवात केली. प्रसिद्ध नाटककार आत्मराम सावंत यांच्या 'राजकारण गेलं चुलीत' या नाटकासाठी निळू फुलेंनी आपल्या तारखा दिल्या होत्या. या नाटकाचे प्रयोग राज्यभरात जोरात सुरू होते.
जेव्हा नाटकाचा प्रयोग हा संगमनेरला होणार होतो. तेव्हा निळू फुलेंना ''Coolie'' सिनेमाचं शुटिंग पुन्हा सुरू झाल्याचं कळालं. अमिताभ यांच्यासोबत शुट करण्यासाठी निर्मात्यांकडून त्यांना तारीख देण्यात आली. पण, नाटकासाठी आधीच तारखा दिल्याने निळू फुले हे कात्रीत अडकले. यावेळी त्यांनी सिनेमाच्या निर्मात्यांनी आता लगेच शुटिंग शक्य नसल्याचं सांगितलं. यानंतर निर्मात्यांनी आमिताभ आणि निळू फुले यांच्या तारखा जुळवून आणल्या आणि सिनेमाचं राहिलेलं शुटिंग पुर्ण झालं.