श्रेया बुगडे दिसणार चिन्मय मांडलेकरसोबत ह्या नाटकात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 05:52 PM2018-07-24T17:52:34+5:302018-07-24T22:00:00+5:30
'समुद्र' नाटक नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला येत असून त्याची निर्मिती भद्रकाली प्रोडक्शन करत आहे.
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आता रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. चिन्मय मांडलेकर लिखित व दिग्दर्शित 'समुद्र' या लोकप्रिय ठरलेल्या नाटकात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'समुद्र' हे नाटक नव्या धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाची पहिली झलक अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मिलिंद बोकील यांची 'समुद्र' या कादंबरीच नाटकात चिन्मय मांडलेकर याने रूपांतर केले. त्याने फक्त रूपांतर केले नाही तर त्यात भूमिकाही केली आणि नाटकाचे दिग्दर्शनही केले. जेव्हा नाटकाचे प्रयोग चालू झाले तेव्हा चिन्मय सोबत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. आता हे नाटक नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला येत असून त्याची निर्मिती भद्रकाली प्रोडक्शन करत आहे. या नाटकात स्पृहाच्या ऐवजी चिन्मय सोबत श्रेया बुगडे दिसणार आहे.
मलाही काहीतरी वेगळ्या धाटणीची भूमिका करायची होती आणि 'समुद्र' या नाटकामुळे ती संधी चालून आली आणि मी नक्कीच त्याचे सोने करेन असे श्रेया म्हणाली.
नाटकाचा विषय आणि त्यातले कलाकार आणि त्यांचा अभिनय यामुळे या नाटकाने १०० हुन अधिक प्रयोग केले. पण काही तांत्रिक बाबींमुळे या नाटकाचे प्रयोग थांबले होते, पण आता परत नव्या धाटणीने आणि श्रेयासोबत चिन्मय नव्या जोमाने हे नाटक पुन्हा रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. चिन्मय व श्रेया या जोडीच्या 'समुद्र' नाटकाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.