१० वर्षांपूर्वीच्या सिनेमातील 'त्या' सीनमुळे श्रेयस तळपदेने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 09:41 AM2023-02-14T09:41:07+5:302023-02-14T09:42:45+5:30
Shreyas Talpade : सोशल मीडियावर कमाल धमाल मालामाल या २०१२च्या चित्रपटातील एक सीन प्रचंड व्हायरल होत आहे आणि या सीनमुळेच श्रेयसला माफी मागावी लागली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. साऊथच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनला आवाज दिल्याने त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. आता श्रेयस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण एका वेगळ्या कारणासाठी. नुकतेच अभिनेत्याने त्याच्या ट्विटरवर एक जाहीर माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर कमाल धमाल मालामाल या २०१२च्या चित्रपटातील एक सीन प्रचंड व्हायरल होत आहे आणि या सीनमुळेच श्रेयसला माफी मागावी लागली आहे.
प्रियदर्शन दिग्दर्शित कमाल धमाल मालामाल या चित्रपटात श्रेयस तळपदे सोबत नाना पाटेकर, ओम पुरी, परेश रावल यांच्यासारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एका सीनमध्ये श्रेयस एका टेम्पोला थांबताना दिसत आहे, हा एक अॅक्शन सीन आहे. तो टेम्पो थांबवताना श्रेयस त्याच्या पुढच्या भागावर लाथ मारताना दिसतो. श्रेयस जिथे लाथ मारतो आहे तिथे गाडीवर आपल्याला ओम (ॐ) पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात ओमला खूप महत्त्व आहे. हा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि या चित्रपटासोबत श्रेयस तळपदेवर टीका होत आहे. याच टीकेवर श्रेयसने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
Apologies 🙏 https://t.co/zEKBEN92qYpic.twitter.com/jr6w3Mku6n
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) February 13, 2023
श्रेयस तळपेदने ट्वीटमध्ये प्रेक्षकांची नम्रपणे माफी मागत म्हणाला की, चित्रपटाचं शूटिंग करतेवेळी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. या शूटिंगदरम्यान एखाद्याची मानसिकता, दिग्दर्शकाची मागणी, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. याचा अर्थ जे तुम्ही पाहताय त्याचे मी स्पष्टीकरण देतो आहे, असं अजिबात नाही. त्या सीन मध्ये जे झाले ते अनावधानाने झाले आणि मी त्यासाठी माफी मागतो. मी ही गोष्ट माझ्या दिग्दर्शकाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. असो पण यापुढे मी पुन्हा अशी कोणतीही कृती करणार नाही, ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील.
श्रेयसने अत्यंत नम्रपणे चूक कबूल केल्याने नेटकऱ्यांनीही त्याची ही माफी कबूल केली आहे. तसेच सोशल मीडियावर त्याचे कौतुक होताना दिसत आहे.