Aapdi Thaapdi Marathi Movie Review : कसा आहे श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वेचा ‘आपडी थापडी’? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: October 9, 2022 06:28 PM2022-10-09T18:28:07+5:302022-10-09T18:30:17+5:30
Aapdi Thaapdi Marathi Movie Review : याचं शीर्षक ‘आपडी थापडी’ असं का याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळतं. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात खुलणारी ही कथा प्राणी प्रेमासोबतच वृक्ष प्रेमाची जाणीव करून देणारी आहे...
दर्जा: *** (तीन स्टार)
कलाकार :श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, नवीन प्रभाकर, खुशी हजारे
दिग्दर्शक : आनंद करीर
निर्माते : केसी पांडे, रियाजत खान, आनंद करीर, साई नारायण, द्रावीत कौर, विशाल शेट्टी
शैली : कॉमेडी ड्रामा
कालावधी : दोन तास
..............................
Aapdi Thaapdi Marathi Movie Review : याचं शीर्षक ‘आपडी थापडी’ असं का याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळतं. यात एका लहान मुलीची आणि तिच्या लाडक्या कोकराची कथा आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात खुलणारी ही कथा प्राणी प्रेमासोबतच वृक्ष प्रेमाची जाणीव करून देणारी आहे. या निमित्तानं बऱ्याच दिवसांनी प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा चित्रपट आला आहे. चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार असले तरी बोलीभाषा आणि इतर गोष्टींमुळे निराशा होते.
कथानक : गोष्ट आहे सखाराम पाटील आणि त्याच्या कंजूष स्वभावाची... सखारामचा नोकर दामू आपल्या मालकाची गोष्ट सांगतो. सखारामच्या घरातील शेळी एका कोकराला जन्म देते. त्याची मुलगी तुळशी उर्फ माऊ त्या कोकराचं पिंकू असं नामकरण करते. सखारामची पत्नी पार्वतीही त्याला दुजोरा देते. नारळी-फोफळीच्या बागांचा मालक असलेला सखाराम पैशांच्या बाबतीत खूपच कंजूष असतो. शेळीचं कोकरू पिंकू काही खात नसल्यानं त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी माऊ आणि पार्वती सखारामच्या मागे लागतात, पण पैसे खर्च होऊ नयेत यासाठी तो नवनवीन युक्त्या करतो. अखेरीस मुंबईतील रुग्णालयात कोकराचा मोफत इलाज होईल असं समजल्यावर तो त्याला मुंबईत आणतो. त्यानंतर जे घडतं ते सिनेमात आहे.
लेखन-दिग्दर्शन : आनंद करीर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची संकल्पना खूप सुरेख असून, भूतदया या संतांनी सांगितलेल्या वचनांची शिकवण देणारी आहे. गोष्टीचा जीव फार लहान असल्यानं विविध घटनांद्वारे ती खुलवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी पूरक ठरतात. गती थोडी मंदावल्यासारखी वाटते. चित्रपटाची कथा कोकणात घडते, पण कलाकारांच्या बोलीभाषेत विरोधाभास जाणवतो. टिपिकल कोकणातील भाषा असती तर वातावरण आणखी खुललं असतं. सखाराम आणि दामू यांची केमिस्ट्री चांगली जमली आहे. रेल्वेच्या स्टॉक रूममधील पहिलाच सीन अतिशय उत्तमरीत्या शूट करण्यात आला असून, नंदू माधव यांनी खूप छान केला आहे. सखारामला वेगवेगळे गेटअप करण्यात वेळकाढूपणा झाला आहे. कंजूष सखाराम महागड्या मेकअपवर खर्च करतो हे पटत नाही. एखादी व्यक्ती कंजूष असली तरी वृक्षांवर जीवापाड प्रेम करू शकते हा पैलू आणखी खुलवता आला असता. गाणं चांगलं झालं आहे. कॅमेरावर्कही चांगलं आहे.
अभिनय : सर्वच कलाकारांनी अभिनय चांगला केला असला तरी बोलीभाषेचा फटका प्रत्येकाच्या कॅरेक्टरला बसल्याचं दिसतं. श्रेयसनं ( Shreyas Talpade) छान रंगवलेला कंजूष मालक पैसे वाचवण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या करताना दिसतो. त्याच्या पत्नीच्या रूपात मुक्ता बर्वे ( Mukta Barve )सर्व समजूनही पतीला दुखावू नये म्हणून मुकाटपणे त्याचा कंजूषपणा सहन करते. मुक्तानंही चांगलं काम केलं आहे. नंदू माधव यांनी साकारलेला टीसी अफलातून आहे. संदीप पाठकनं वठवलेला दामू कोणत्याही दृष्टिकोनातून कोकणातील वाटत नाही. लोणच्यासारखा तोंडी लावायला असलेला खलनायकाच्या रूपात नवीन प्रभाकर अधूनमधून येऊन टपली मारून जातो. खुशी हजारे या बालअभिनेत्रीनं सुरेख अभिनय केला आहे.
सकारात्मक बाजू : संकल्पना, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, गाणी, वातावरण निर्मिती, निसर्गरम्य सौंदर्य, कॅमेरावर्क
नकारात्मक बाजू : छोटा असलेला गोष्टीचा जीव, बोलीभाषा, काही लांबलचक दृश्ये, सिनेमाची गती
थोडक्यात : या चित्रपटात बऱ्याच उणिवा राहिल्या आहेत, पण माणसाप्रमाणेच जीव असणाऱ्या प्राण्यांसोबत कसं वागायला हवं याची जाणीव करून देणारा हा चित्रपट लहान मुलांसोबतच मोठ्यांनीही एकदा पहायला हरकत नाही.