श्रेयस तळपदेनं १६ वर्षांपूर्वीच्या आठवणीला दिला उजाळा, म्हणाला - 'आयुष्यात मी पहिल्यांदाच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:21 PM2022-09-26T12:21:39+5:302022-09-26T12:22:13+5:30
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
मराठी आणि हिंदी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath)मध्ये यशच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेसोबतच श्रेयसच्या हातात सध्या तीन मोठे चित्रपट आहेत जे लवकरच रिलीज होणार आहेत. श्रेयसने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, जी अभिनेता म्हणून त्याने केलेली पहिली गोष्ट आहे. हा फोटो पाहून श्रेयससोबत त्याचे चाहतेही जुन्या आठवणीत रमून गेले आहेत.
श्रेयस तळपदेने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याचा डोर चित्रपटातला आहे. या फोटोसोबत त्याच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. २००६ साली पडद्यावर आलेल्या डोर या चित्रपटाने दोन महिलांच्या आयुष्याचा प्रवास दाखवला होता. याच चित्रपटासाठी श्रेयसने त्याच्या कलाकार म्हणून आयुष्यातील पहिली लूक टेस्ट दिली होती. माझ्या आयुष्यातील पहिली लूक टेस्ट अशी कॅप्शन श्रेयसने दिले आहे.
या फोटोत श्रेयस पांढऱ्या रंगाच्या धोती आणि कुर्तामध्ये दिसत आहे. खांद्याला रंगीत कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेलं गाठोडं अडकवलं आहे. डोक्याला एक साधंसं कापड पगडीसारखं बांधलं आहे. आणि हात कपाळाशी नेऊन कुणालातरी शोधत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आहे. डोर सिनेमातील बहुरूपियाच्या भूमिकेसाठी श्रेयसने पहिल्यांदा लूक टेस्ट दिली तो हा क्षण असल्याचे त्याने सांगितले आहे. २००६ या काळात स्त्रीप्रधान सिनेमा बनवण्याचे पाऊल डोर या सिनेमाच्या टीमने टाकले. मी या सिनेमाचा एक भाग होतो याचा खूप आनंद आहे, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गुल पनाग आणि आयेशा टाकिया यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. दोन महिलांच्या जीवनप्रवासातील मी एक धागा होतो. माझी भूमिका छोटी असली तरी खूप महत्वाची होती. डोरमधल्या माझ्या भूमिकेनेच मला शिकवलं की कोणतीही भूमिका किती लहान आहे, मोठी आहे ही गोष्ट गौण असते. भूमिकेच्या स्क्रिनटाइमपेक्षा कलाकार म्हणून ती आपण किती जगतो हे महत्वाचं आहे. डोर सिनेमासाठी दिलेली आयुष्यातील पहिली लूक टेस्ट आणि सिनेमाचा तो सगळा अनुभव याला आज या गोष्टीला १६ वर्षे झाल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.