श्रेयस तळपदे दगडूशेठचा रस्ताच चुकला, पुढे देवासारखी भेटली 'ती' व्यक्ती अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:11 AM2023-09-26T11:11:12+5:302023-09-26T11:21:45+5:30
"आम्ही चुकलो हे त्यांनी कळलं आणि...", दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा रस्ता चुकलेल्या श्रेयस तळपदेला पोलिसाने दाखवली वाट
गेले काही दिवस राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतात. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला निघालेला मराठमोळा श्रेयस तळपदे वाट चुकला. त्यादरम्यान आलेला अनुभव त्याने शेअर केला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा रस्ता चुकलेल्या श्रेयसला एका पोलिसाने वाट शोधून देण्यास मदत केली. श्रेयसने त्याचा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
श्रेयस तळपदेची पोस्ट
देव आपल्याला रहस्यमय मार्गाने भेटत असतो. आज तो आम्हाला बापू वाघमोडे यांच्या रुपात भेटला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना आम्ही रस्ता चुकलो. बापू वाघमोडे आले आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. आम्ही चुकलोय हे त्यांना कळलं आणि त्यांनी त्यांच्या बाईकवरुन आम्हाला शेवटपर्यंत रस्ता दाखवला.आम्ही वेळेत पोहोचू याची काळजीही त्यांनी घेतली. थँक्यू साहेब...
देव हा आपल्याभोवतीच असतो. आपल्याला फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. तो आपल्याला भेटतो, मदत करतो, मार्ग दाखवतो, आपल्याशी बोलतो...आपण फक्त त्याला ओळखलं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीला आदरपूर्वक वागणूक द्या. कारण, देव कोणत्या रुपात येतो, हे तुम्हालाही ठाऊक नसतं. गणपती बाप्पा मोरया...
श्रेयस तळपदेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी श्रेयसला मदत करणाऱ्या पोलिसाचं कौतुक केलं आहे.