वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवलेली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:49 PM2024-04-12T12:49:05+5:302024-04-12T12:50:39+5:30
वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा वाचाच (swargandharva sudhir phadke)
सध्या मराठी मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमाची. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ज्यांना आदराने 'बाबूजी' म्हणतो अशा सुधीर फडकेंच्या आयुष्यावर हा सिनेमा येणार आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा टिझर प्रेक्षकांना आवडत आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक खास किस्सा समोर येतोय. बाबूजी अर्थात वडिलांवर चित्रपट करण्याआधी सुधीर फडकेंचे पुत्र ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी निर्मात्यांसमोर एक अट ठेवली होती. काय होती ती अट?
'स्वरगंधर्व सुधीर फडके' ची घोषणा झाली तेव्हा रंगमंचावर श्रीधर फडके यांनी हा किस्सा सर्वांना सांगितला. श्रीधर म्हणाले, "बाबूजींवर चित्रपट करण्यापुर्वी मी सांगितलं होतं की एकदा पटकथा मला ऐकायचीय. ती पटकथा ऐकूनच मी आपल्याला सांगेन. पण त्या दोघांनी अप्रतिम पटकथा लिहिलीय. चित्रपटातले संवाद खुप छान लिहिले आहेत." असं म्हणत श्रीधर फडकेंनी सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं.
श्रीधर फडके पुढे सांगतात, "मी चित्रपटाच्या टीमला आणखी एक विनंती केली होती. त्या विनंतीला त्यांनी मान दिला. ती म्हणजे, नवीन कोणतंही गाणं रेकॉर्ड करु नका. बाबूजींनीच गायलेली गाणी यात ठेवा. त्यांनी माझं ऐकलं. त्यामुळे पडद्यावर ही गाणी ऐकताना रोमांच उभे राहतात." 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा सिनेमा १ मे २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.