"लक्ष असू दे मोहन..." शुभांगी गोखले पतीच्या आठवणीत भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:48 AM2023-04-30T09:48:48+5:302023-04-30T09:50:57+5:30
नाटकात काम करत असताना शुभांगी यांची मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली होती.
मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) पती मोहन गोखले (Mohan Gokhale) यांच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत. काल मोहन गोखले यांचा २४ वा स्मृतीदिन होता. लक्ष असू दे मोहन...असं भावूक कॅप्शन देत शुभांगी यांनी एक जुना फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर कलाविश्वातील अनेक कलाकारही भावूक झाले आहेत.
नाटकात काम करत असताना शुभांगी यांची मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली होती. यानंतर दोघांनी नाटक, मालिकेतून एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. ‘मिस्टर योगी’ ही दोघांची हिंदी मालिका खूप गाजली होती. एकत्र काम करता करता शुभांगी व मोहन प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. मात्र खूप कमी वयात मोहन गोखलेंचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. पत्नी शुभांगी गोखले यांनी त्यांच्या चित्रपटातील एका सीनचा फोटो पोस्ट केला असून त्याखाली कॅप्शन देत लिहिले,''आठवणींचं बरं असतं..येतजात तरी रहातात..
आज तर मुक्कामाला आहेत..लक्ष असू दे मोहन..वर्षं चोवीसावे!!''
मोहन गोखले यांनी हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपला चांगलाच जम बसवला. मात्र 29 एप्रिल 1999 रोजी चेन्नई येथे ‘हे राम’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मोहन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या निधनानंतर स्वत:ला सावरत शुभांगी गोखले यांनी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, हम है ना, डॅडी समझा करो, लापतागंज, राजा राणीची गं जोडी, झेंडा, क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला.