श्यामची आई या चित्रपटातील चिमुकला आजही करतो चित्रपटसृष्टीवर राज्य, या चित्रपटांमध्ये केले आहे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:24 PM2020-05-27T13:24:52+5:302020-05-27T13:33:22+5:30
श्यामची आई या चित्रपटात चिमुकल्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी साकारली होती. आज या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी आजही ते चित्रपटसृष्टीचा भाग आहेत.
श्यामची आई या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. अनेक पिढ्यांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा पहिला मान या चित्रपटाला मिळालेला असल्याने हा चित्रपट सगळ्यांसाठी खूप खास आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटातील छडी लागे छम छम हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात वनमाला देवी, दामुअण्णा जोशी आणि बालकलाकार माधव वझे यांच्या मुख्य भूमिका होत्या.
श्यामची आई या चित्रपटात चिमुकल्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी साकारली होती. आज या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी आजही ते चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. थ्री इडियट या आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटात आत्महत्या करत असलेला जॉय लोबो तुम्हाला आठवतो का? याच जॉयच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. तसेच त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आलिया भट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटात देखील काम केले होते. ते आलिया भटच्या आजोबांच्या भूमिकेत या चित्रपटात दिसले होते.
माधव वझे यांनी केवळ अभिनयाकडेच लक्ष केंद्रित केले असे नाही तर त्यांनी आपल्या शिक्षणाला देखील तितकेच महत्त्व दिले. माधव वझे हे बालपणापासून अभिनयक्षेत्रात असले तरी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते पेशाने शिक्षक आहेत. काहीच वर्षांपूर्वी पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडे देखील त्यांचा कल आहे. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. या नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.