मराठीतील हे प्रसिद्ध कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात, पाहा त्यांच्या केळवणाचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:24 PM2020-12-21T12:24:25+5:302020-12-21T12:29:33+5:30
या कपलचे मित्रमैत्रीण सध्या त्यांना केळवणासाठी घरी बोलवत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. या दोघांचा गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला. त्याआधीपासून ते दोघे सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत होते. सिद्धार्थ आणि मितालीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे.
सिद्धार्थ आणि मिताली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थ केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. सिद्धार्थ आणि मितालीचे पहिले केळवण इशा केसकरच्या घरी करण्यात आले तर दुसरे केळवण सिद्धार्थच्या मुंबईतील मित्रांनी केले. सिद्धार्थ मुळचा पुण्याचा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तो कामानिमित्त मुंबईत राहात आहे. सुरुवातीला सिद्धार्थ त्याच्या काही मित्रांसोबत विलेपार्ले येथे एकत्र एकाच फ्लॅटमध्ये राहात होता. याच सगळ्या मित्रांनी मिळून त्यांचे केळवण केले.
सिद्धार्थ आणि मितालीचे हे केळवणाचे फोटो पाहून त्यांचे फॅन्स खूश झाले आहेत. त्यांच्या लग्नाची ते आतुरतेने वाट पाहात असल्याचे ते कमेंटद्वारे सांगत आहेत. त्यांनी लग्नाची तारीख त्यांच्या चाहत्यांना सांगितली नसली तरी ते या वर्षाच्या अखेरीस अथवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लग्न करतील अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं. सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने 'झेंडा', 'बालगंधर्व', 'सतरंगी रे', 'क्लासमेट्स', 'वजनदार' यांसारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील त्याच्या 'जिवलगा' या मालिकेला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्याची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरीजही रसिकांना भावली. सिद्धार्थने त्याच्या अभिनयाद्वारे
प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.