"देशाचं हित बघणारा महान माणूस गेला", सिद्धार्थ चांदेकरची रतन टाटा यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:36 AM2024-10-10T11:36:54+5:302024-10-10T11:37:49+5:30
Ratan Tata : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा (Ratan Naval Tata) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशासह जगभरातून सामान्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेदेखीलरतन टाटा यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर रतन टाटा यांचा फोटो शेअर करत लिहिले की, कधी त्यांना भेटायची संधी नाही मिळाली, त्यांना प्रत्यक्ष बघायची संधी नाही मिळाली, पण ह्या बातमी नंतर आपल्या घरचंच कुणीतरी गेल्यासारखे डोळे का भरून आले कुणास ठाऊक. त्यांना फक्त पाहिलंय, त्यांच्या गोष्टी ऐकल्या, त्यांची भाषणं ऐकली, पुस्तकं वाचली, आणि कळत नकळत त्यांना फॅमिली करून घेतलं. माणूसच असा होता, काय करणार? आपल्याकडे उद्योजक खूप आहेत, पण आज भारताचा खरा उद्योगपती आणि समाजसेवक गेला.
त्याने पुढे म्हटले की, पहिल्यांदा आपल्या देशाचं हित बघणारा एक (आणि शेवटचा) महान माणूस गेला. सर, तुम्ही होता, तुम्ही आहात आणि तुम्ही नेहमीच लिजेंड राहाल! RIP पद्मविभूषण रतनजी टाटा.
दीर्घ आजाराने रतन टाटांचे झाले निधन
रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यातर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्सचे चेअरमन एन् चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.