"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 18:17 IST2024-01-12T18:16:37+5:302024-01-12T18:17:08+5:30
"अरेंजमॅरेज केलंस तर घटस्फोट होईल", 'श्रीदेवी प्रसन्न'च्या ट्रेलरने वेधलं लक्ष

"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
२०२३ हे वर्ष मराठी चित्रपटांनी गाजवलं. आता नव्या वर्षातही मराठी सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असलेला 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई-सिद्धार्थ ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातून सई आणि सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये या सिनेमातील मजेशीर संवादाची झलक पाहायला मिळत आहे. सई-सिद्धार्थमधले हलकेफुलके संवाद आणि त्यांची केमिस्ट्री याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "टक्कल पडायच्या आत लग्न करून टाकावं", "प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", "अरेंजमॅरेज केलंस तर तुझा घटस्फोट होईल" ट्रेलरमधील हे संवाद लक्षवेधी ठरत आहेत. श्रीदेवी प्रसन्न सिनेमाचा २.३९ मिनिटांच्या ट्रेलरमधून या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे.
सई आणि सिद्धार्थबरोबर 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमात अभिनेत्री रसिका सुनील आणि अभिनेता सिद्धार्थ बोडकेही झळकणार आहे. त्याबरोबरच संजय मोने, शुभांगी गोखले, सुलभा आर्य या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अदिती मोघे यांचं लेखन असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल मोढवे यांनी केलं आहे. येत्या २ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.