सिद्धार्थ जाधवने अपघातानंतरही पूर्ण केले शूटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 08:30 PM2019-01-31T20:30:00+5:302019-01-31T20:30:00+5:30
विनोदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
विनोदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांच्या मनोरंजक भूमिका आहेत.
या सिनेमात दोन हिरो आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे सिध्दार्थ जाधव. या सिनेमातील ‘बाब्या’ पात्राविषयी सांगताना सिध्दार्थने म्हटले की, “बाब्या खूप बिनधास्त, मनमौजी आयुष्य जगणारा मुलगा आहे. त्याचा मित्र समीर याचा तो फिलॉसॉफर, गाईड आहे. प्रेमाच्या बाबतीत तर बाब्याने पीएचडी केली आहे. आमिर खान त्याचा आदर्श आहे आणि ‘बस,ट्रेन और लडकी के पिछे भागना नहीं, एक गई तो दुसरी आती हैं’ हा आमिर खानचा डायलॉग बाब्याचा कानमंत्र आहे. समीर खूप साधा असल्यामुळे मुली त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि त्याच्या अशा परिस्थितीत बाब्या त्याची मदत करतो आणि त्यानंतर सिनेमात धमाल होते.”
या सिनेमातील ‘दिलाची तार’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सिध्दार्थचा अपघात झाला असूनही त्याने या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आणि याचे श्रेय निर्माते अमोल उतेकर, सौरभ गोखले, समीर आठल्ये आणि उमेश जाधव यांना जाते, असे म्हणत सिध्दूने त्या दिवशीचा प्रसंग सांगितला की, ‘दिलाची तार’ गाण्याचा सेट लागला होता, शूटची तारीखही ठरली होती, कलाकार आणि डान्सर्स तयार होते. त्यावेळी मला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मला ठीक वाटत नसल्याचे माझ्या मेकअप मॅनने अमोल उतेकर यांना कळवले. अमोलने तातडीने मला दवाखान्यात नेले. अमोलने शूट रद्द करण्यास सांगितले होते. पण त्याने असं करु नये असं माझं म्हणणं होतं कारण जवळपास गाण्याच्या शूटची सर्वच तयारी झाली होती. ट्रिटमेंट घेतल्यावर मी सेटवर गेलो तेव्हा सर्वांची एनर्जी तशीच होती, सेटवर माझं वेलकम केलं. माझ्या हाताला आयव्ही होती कारण मला शूटनंतर पुन्हा दवाखान्यात ट्रिटमेंट पूर्ण करण्यासाठी जायचे होते. आणि ती आयव्ही लपवण्यासाठी माझ्या हाताला लाल रंगाचा रुमाल लावला होता. अशाप्रकारे माझ्या सह-कलाकारासोबत मी त्याच एनर्जीने डान्स पण केला.”
या सिनेमातला आणखी एक हिरो, जो सिनेमात बाब्याचा मित्र दाखवला आहे, समीर उर्फ सौरभ गोखलेविषयी सांगताना सिध्दार्थने म्हटले की, “सौरभसोबत तर जवळ-जवळ आमचा ब्रोमान्स सुरु झालाय. ब्रोमान्स हा शब्द मी खूप छान पध्दतीने वापरतोय. सौरभ कलाकार म्हणून चांगला आहेच पण सह-कलाकार म्हणून त्याहून जास्त चांगला आहे. मी त्याचे सिनेमे पाहिले आहेत, क्रिकेटच्या मैदानावर भेटलो आहे. पण या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, आमच्यात मैत्री झाली.”
“दिग्दर्शक खूप महत्त्वाचा आहे, आमचा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी आमच्याकडून त्यांना जे अपेक्षित होतं तसं काम करुन घेतलं. विनोदी सीन, शूट, किस्से संपूर्ण स्टारकास्टने खूप एन्जॉय केले आणि तुम्ही पण हा सिनेमा नक्की एन्जॉय कराल”, सिध्दू.