सिद्धार्थ जाधवला मिळाला 'बेस्ट ॲक्टर ज्युरी' पुरस्कार, म्हणतो- "तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 12:35 PM2024-06-09T12:35:59+5:302024-06-09T12:36:16+5:30
सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये 'बालभारती' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी' पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे.
उत्तम अभिनय आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत छाप पाडली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सिद्धार्थने बॉलिवूडही गाजवलं. रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये सिद्धार्थ महत्त्वाच्या भूमिका करताना दिसला. नुकतंच सिद्धार्थला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
सिद्धार्थचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट तसेच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचे अपडेट्सही सिद्धार्थ सोशल मीडियावर चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये 'बालभारती' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी' पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे.
BEST ACTOR (JURY ) बालभारती ❤️
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024" मध्ये आमचा सिनेमा "बालभारती" यासाठी मला जुरीचं "बेस्ट ऍक्टर" हे अवॉर्ड मिळालं...
मनापासून आनंद होतो "बालभारती" सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर appretiate केलं जातंय. काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे. देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून 'बालभारती'साठी award मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ...
आमचे producer, सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक...Lv u team
सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. सिद्धार्थचा हा बालभारती सिनेमा डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. इंग्रजी बोलता येत नसलं तरी आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यायला हवं या हट्टापायी पालक मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत प्रवेश घेतात. याचा मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम होतो आणि त्यांचा विकास कसा खुंटतो त्याचं चित्रण दिग्दर्शक या चित्रपटातून करण्यात आलं होतं.