'अशी ही बनवाबनवी'मधील "हृदयी वसंत फुलताना..." गाण्यावर सिद्धार्थने बनवला रील, नेटकरी म्हणाले- "वाह दादा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:43 IST2024-08-02T13:41:57+5:302024-08-02T13:43:39+5:30
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने "हृदयी वसंत फुलताना" गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

'अशी ही बनवाबनवी'मधील "हृदयी वसंत फुलताना..." गाण्यावर सिद्धार्थने बनवला रील, नेटकरी म्हणाले- "वाह दादा..."
'अशी ही बनवाबनवी' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आज तब्बल ३६ वर्षांनीही प्रेक्षकांचं तितकचं मनोरंजन करतो. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, अश्विनी भावे, सुधीर जोशी, सिद्धार्थ रे, विजू खोटे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमावर प्रेक्षक आजही प्रेम करतात. या सिनेमातील डायलॉगबरोबरच गाणीही प्रचंड हिट ठरली होती.
"हृदयी वसंत फुलताना" हे 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील लोकप्रिय ठरलेलं गाणं आहे. सिनेमातील जोड्यांवर चित्रित झालेलं हे लव्ह साँग लागलं की आज पावलं आपोआप थिरकतात. अनेक रील व्हिडिओही या गाण्यावर व्हायरल होताना दिसतात. आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ गाडीत असून त्याने गाडीमध्ये 'अशी ही बनवाबनवी'मधलं "हृदयी वसंत फुलताना हे गाणं लावल्याचं दिसत आहे. सिद्धार्थही हे गाणं गुणगुणताना दिसत आहे.
"ह्रदयी वसंत फुलताना...All time favourite...अशी ही बनवाबनवी", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, सिद्धार्थ 'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्येही तो दिसणार आहे.