मुसळधार पावसात On Duty असलेल्या मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा कडक Salute! शेअर केला सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:50 IST2024-07-08T13:49:24+5:302024-07-08T13:50:10+5:30
Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत.

मुसळधार पावसात On Duty असलेल्या मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा कडक Salute! शेअर केला सेल्फी
सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने प्रचंड मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही सिद्धार्थने नाव कमावलं आहे. अभिनयाबरोबरच सिद्धार्थ त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. सध्या सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. पण, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत. सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो ड्युटीवर असलेल्या पोलिसांबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे.
सिद्धार्थनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोलिसांबरोबरचा हा सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने सिंबा सिनेमातील गाण्याचं म्युझिक दिलं आहे. मुंबई पोलीस, सॅल्युट, ऑन ड्युटी, सिंबा असे हॅशटॅग त्याने या फोटोला दिले आहेत.
दरम्यान, मराठीबरोबरच सिद्धार्थ रोहित शेट्टीच्या बॉलिवूड सिनेमांमध्येही दिसला. 'सिंबा', 'सर्कस' या बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. सिद्धार्थची 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमात वर्णी लागली आहे. तर 'मटका किंग' या नागराज मंजुळेंच्या हिंदी वेब सीरिजमधून तो ओटीटीवर पदार्पण करत आहे.