गायिका बेला शेंडे अभिनेत्रीही होणार? 'संगीत मानापमान'मध्ये साकारली भूमिका; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:23 IST2025-01-16T17:23:13+5:302025-01-16T17:23:36+5:30
बेला शेंडेच्या गाण्यांचे रसिक तर आहेतच पण आता तिचा अभिनयही पाहायला मिळणार?

गायिका बेला शेंडे अभिनेत्रीही होणार? 'संगीत मानापमान'मध्ये साकारली भूमिका; म्हणाली...
मराठीतील लोकप्रिय गायिका बेला शेंडेचे (Bela Shende) अनेक चाहते आहेत. बेलाच्या सुमधूर आवाजाची स्तुती करावी तितकी कमीच आहे. सुबोध भावेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'संगीत मानापमान' सिनेमात बेलाने 'ऋतू वसंत' गाणं गायलं आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान गायिका बेला शेंडे या सिनेमात छोट्या भूमिकेतही झळकली आहे. सांगितीक सिनेमात तिला गाणं गायची आणि अभिनय करण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे आता बेला भविष्यात अभिनेत्री म्हणूनही पडद्यावर दिसू शकते यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बेला शेंडे म्हणाली, "सिनेमात आपणही दिसणं ही माझी पहिलीच वेळ आहे. याआधी मी माझ्याच गाण्यांच्या अल्बममध्ये दिसले होते. पण सुबोध भावेचे मी आभार मानते. त्याला माझ्यात ते दिसलं आणि त्याने मला भूमिकेचीही ऑफर दिली. मनात धाकधूक होती की हे कसं दिसणार आहे असं वाटत होतं. जितकी गाण्याची उत्सुकता होती तितकीच यावेळी चित्रीकरणाचीही होती. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मला खूप आनंद होतोय."
पूर्णवेळ सिनेमात दिसणार का? यावर बेला म्हणाली, "मला याआधीही ऑफर आल्या आहेत. पण पहिलं प्रेम हे कायम गाणं राहिलं आहे आणि राहणारच आहे. मला ऑफर आल्या आहे, लोकांनी विचारलं आहे. तरी जर खूपच काही छान आलं जे मनाला भिडणारं असेल तर बघू. काहीही होऊ शकतं."