असाच आवाज देवानं दिला तर काय करू? ‘तुला कोण ऐकतं’ म्हणणाऱ्याला महेश काळेचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:02 PM2021-04-12T13:02:50+5:302021-04-12T13:03:49+5:30
काही लोकांनी महेशला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मग काय? महेशने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
अद्वितीय सुरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे महेश काळे. (Singer Mahesh Kale) त्याची स्वरमैफल ही जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणीच ठरते. म्हणूनच त्याचा कार्यक्रम म्हटला की लोक अफाट गर्दी करतात. अनेक दर्दी तर महेशची तुलना प्रख्यात गायक भीमसेन जोशी यांच्याशी करतात. पण गर्दीतील प्रत्येकजणांना ही तुलना कशी आवडणार? याचवरून काही लोकांनी महेशला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मग काय? महेशने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
महेशने आपला एक फोटो फेसबुकवर शेअर केला. त्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. मात्र काहींनी हा फोटो सोडून महेशच्या गायन शैलीवरून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
‘भीमसेन एकच होऊ शकतात. तू तर नाकात गातो एवढं कर्कश़ कोण ऐकतं कोण तुला? अशा शब्दात एकाने महेशला ट्रोल केले. या ट्रोलरला महेशने अगदी संयमाने उत्तर देत शांत केले.
‘खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते तुम्ही सुखरुप रहा,’ अशा शब्दांत महेशने या ट्रोलरची बोलती बंद केली.
आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा महेश काळे याची संगीतकार अशीही एक ओळख आहे. महेशने ‘नकुशी’ या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचे टायटल साँग महेशने संगीतबद्ध केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळे महेश काळे हे नाव सर्वदूर पोहोचले. या सिनेमासाठी महेशला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.