गायक महेश काळेंनी अनिवासी भारतीयांच्या मुलांसोबत गायलं 'ऐक्य मंत्र' गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:31 PM2022-08-18T13:31:09+5:302022-08-18T13:31:34+5:30
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त 'ऐक्य मंत्र' हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) आणि जगभरातील अनिवासी भारतीयांच्या मुलांनी ‘ऐक्य मंत्र’ या शास्त्रीय संगीतावर आधारीत एकात्मतेचे गाणे म्हणत, मातृभूमी भारत आणि भारतीय संस्कृती यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे नागरिकांनीही या गाण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून,पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख लोकांनी विविध सोशल मीडिया प्लॅटॉर्मवर हे गाणे पाहिले आहे.
या नवीन गाण्याबाबत गायक महेश काळे म्हणाले, इंडियन क्लासिकल म्युझिक अंड आर्ट फाउंडेशन (आयसीएमए) या सॅन फ्रान्सिस्को स्थित स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने आम्ही हे गीत सादर करत आहोत. 'अनेकता मे ऐक्य मंत्र ' असे हे गीत असून, विविधतेत ऐकता, असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. हे गाणे सारंग, शंकरा-हंसध्वनी, केदार आणि भैरवी या चार रागांवर आधारित आहे. गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, कर्जतजवळील गावातील काही ठिकाणे तसेच अमेरिकेतील स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सिडनीतील ओपेरा हाउस यासारख्या ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी करण्यात आले असून, विविधतेत एकता असल्याचे या गाण्यातून दर्शविण्यात आले आहे."
या गाण्याचे विशेष म्हणजे यामध्ये अमेरिका, दक्षिणा अमेरिका, कॅनडा, मध्य आशियाई देश अशा विविध देशांमधील ८ ते १५ वर्षे वयोगटातील ५० हून अधिक अनिवासी भारतीय मुले अर्थात 'ग्लोबल इंडियन्स' सहभागी झाली आहेत. परदेशात जन्मलेले आणि तिथेच वाढले असले, तरी आपल्या भारतीय पालकांमुळे भारत देशासोबत, येथील संस्कार आणि संस्कृती यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनिवासी भारतीय मुलांनी या गाण्याच्या माध्यमातून आपली मातृभूमी आणि भारतीय संस्कृती यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला सहभाग नोंदविला आहे.
अनिवासी भारतीयांना आपल्या देशाप्रती प्रचंड आदर आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो ते व्यक्तही करतात. मात्र हे उपक्रम परदेशात होत असल्याने, अनेकदा भारतातील लोकांना याबाबत फारशी माहिती नसते. या गाण्याच्या माध्यमातून निवासी आणि अनिवासी भारतीय यांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही महेश काळे यांनी सांगितले.