अखेर दुबईत सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत अडकली लग्नबेडीत, कुटुंबियांनी लावली ऑनलाईन उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:42 PM2021-05-18T19:42:07+5:302021-05-18T19:42:49+5:30
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या वाढदिवसादिवशी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केल्याचे सोशल मीडियावर सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज ३३वा वाढदिवस साजरा करते आहे. आज तिने वाढदिवसादिवशी तिचा फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केल्याचे जाहीर केले. याबाबत तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. तिचे लग्न ७ मे रोजी दुबईत पार पडले. यावेळी तिच्या घरातल्यांनी भारतातून आणि कुणालच्या घरातले लंडनमधून ऑनलाईन लग्नाला उपस्थिती लावली. मागील वर्षी याच दिवशी तिने चाहत्यांना दुबईत साखरपुडा केल्याचे सांगितले होते.
सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, अब से हम ‘7’ ‘मे’ . आम्ही जूनमध्ये लंडनला लग्न करणार होतो. लंडनमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे ढकलावी लागली, मग व्हेन्यूच्या उपलब्धते अनुसार जुलैमधली तारीख ठरली.
कुणाल बरोबर बसून लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले, आणि भारतात कोरोनाची दुसरी लाट आली.
मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही! एप्रिलमध्ये लंडनने भारतीयांच्या ट्रॅव्हलवर बंदी जाहीर केला. जुलै पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून.. क्वारंटाइन,प्रवासावरील नियम,कुटुंबासाठी असणारी रिस्क, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला.
सोनाली पुढे म्हणाली की, जुनचे जुलै होतंय, म्हणलं पोस्टपोन करायच्या ऐवजी जुलैचं मेमध्ये करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखे भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही...आताच शिक्कामोर्तब करून टाकू. २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदिरात,( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून ( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) लग्नाच्या प्रमाणापत्रावर सही केली.
या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि पेपरवर्कमध्ये सोनाली कुलकर्णीला मदत करणाऱ्या सर्वांचे तिने सोशल मीडियावर आभार मानले आहेत.तसेच तिने पुढे जेव्हा, जिथे, जसे शक्य होईल, तेव्हा तिथे तसे फॅमिली, फ्रेंड्ससोबत विधीनिशी ड्रीम व्हेडिंग करूच. तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असू द्या असेही सोनालीने पोस्टमध्ये म्हटले.