सोनाली कुलकर्णी आहे तिच्या राजकुमारच्या शोधात, आईने दिले लग्नाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 07:11 PM2019-03-30T19:11:29+5:302019-03-30T19:19:04+5:30
आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं सोनालीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावरील सोनालीचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली होती. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा लूक पाहून तिने लग्न केले असल्याचे वाटले होते. सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यामुळे सोनाली कुलकर्णीनेही लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत अडकावे अशी तिच्या आईची इच्छा आहे. सोनालीने आपल्या पसंतीचा जोडीदार निवडत दोनाचे चार हात करावे असे तिच्या आईनेही सांगितले आहे.
तसेत सोनालीलाही लग्नाचे वेध लागले आहेत. आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं सोनालीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र हे लग्न जगावेगळे म्हणजे किमान विराट-अनुष्काच्या लग्नाप्रमाणे राजा राणीसारखं असावं असं सोनालीने सांगितले होते. एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले होते. त्यामुळे आता सोनालीही लग्नाची न्युज कधी देणारयाकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.
सोनालीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनाली तिच्या भूमिकांच्या बाबतीत नेहमीच चोखंदळ असते. त्यामुळे आता सुद्धा ती एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूप वेगळा असणार आहे.
सोनालीच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रपटाचा विषय कोणता असणार, तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत सोनालीने मौन राखणेच पसंत केले आहे. सोनाली तिच्या या ऐतिहासिक चित्रपटात कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिच्या फॅन्सना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार.