सोनाली कुलकर्णी म्हणतेय 'मी एकटी', 'शॉर्ट ॲण्ड स्वीट'मधील रोमँटिक गाणं रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 13:06 IST2023-10-12T13:06:22+5:302023-10-12T13:06:43+5:30
Short And Sweet Movie : 'शॉर्ट ॲण्ड स्वीट' या चित्रपटातील 'मी एकटी' हे गोड गाणे प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणतेय 'मी एकटी', 'शॉर्ट ॲण्ड स्वीट'मधील रोमँटिक गाणं रिलीज
'शॉर्ट ॲण्ड स्वीट' (Short And Sweet Movie) या चित्रपटातील 'मी एकटी' हे गोड गाणे प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि श्रीधर वत्सर (Shridhar Vatsar) यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात सोनाली कुलकर्णी श्रीधर वत्सर यांची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. त्यांच्यातील हे गोड नाते, निरागस प्रेम खूपच सुंदर आहे. गाण्याचे बोलही तितकेच मधुर आहेत. साथीदाराला भेटण्याची ओढ या गाण्यातून व्यक्त होत आहे.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश कदम म्हणतात, आज या चित्रपटातील दुसरे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. साथीदाराबद्दल असलेली प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. हे सुंदर गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. नवरा बायकोच्या एकत्र बसून गप्पा मारणे, जेवण बनवणे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यातली एक गंमत, भावनिक क्षण या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. यातूनच खरं प्रेम बहरते. मंगेश कांगणे यांचे बोल आणि संतोष मुळेकर यांचे संगीत आणि त्याला लाभलेला आनंदी जोशीचा आवाज हे समीकरण खूप मस्त आहे.
शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव निर्मित आणि गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर यांच्यासह या चित्रपटात हर्षद अतकरी, रसिका सुनील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.