'मी इंडस्ट्रीत मित्र बनवायला आले नाही...' सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:30 PM2024-04-11T19:30:00+5:302024-04-11T19:30:02+5:30
इंडस्ट्रीतील लोकांशी मैत्री करण्यावर तिने मोठं विधान केलंय. फिल्म इंडस्ट्रीत कोणत्याच गटात नसण्याविषयी ती काय म्हणाली वाचा.
मराठी, बॉलिवूड आणि इतरही भाषांमध्ये अभिनयाचा डंका गाजवणारी सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). 'दिल चाहता है' ते रोहित शेट्टीचा 'सिंघम' अशा सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत आणि तिचं कौतुकही झालं आहे. सोनाली अनेकदा तिच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत येते. इंडस्ट्रीतील लोकांशी मैत्री करण्यावर तिने मोठं विधान केलंय. फिल्म इंडस्ट्रीत कोणत्याच गटात नसण्याविषयी ती काय म्हणाली वाचा.
फिल्म इंडस्ट्रीत विशेषत: बॉलिवूडमध्ये अनेक गट विभागले गेले आहेत अशी चर्चा असते. एखाद्या गटात आपली जागा मिळवण्यासाठी कलाकारांना अनेकांशी मैत्री ठेवावी लागते ज्यांच्या ते अजिबातच जवळ नव्हते. मात्र सोनाली कुलकर्णीने याबाबतीत नेहमीच तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सोनाली म्हणाली, "या इंडस्ट्रीत मी कामाने ओळख बनवली आहे. मित्र म्हणून कोणाला मदत करायची झाल्यास मी करेन पण सिनेमात काम देईन इतकं मोठं आश्वासन मी नाही देऊ शकत. तसंच मला सेटवर जाण्याची इच्छा होईल अशा भूमिका मिळाल्या पाहिजेत. जर असं नसेल तर मी माझं १०० टक्के देऊ शकत नाही. मी या इंडस्ट्रीत काम करत आहे कारण मी एकसारखंच काम सतत करु शकत नाही. कोणत्याही प्रोजेक्टच्या शूटिंगपासून ते प्रमोशनपर्यंत जवळपास एक वर्ष निघून जातं. मी त्या प्रोजेक्टमध्येच स्वत:ला जास्त व्यस्त ठेवते."
ती पुढे म्हणाली, "जोपर्यंत मला स्क्रीप्ट आवडत नाही, तोवर मी प्रोजेक्ट स्वीकारत नाही. अनेकदा मी नकारही दिला आहे. मी या इंडस्ट्रीत मित्र किंवा कुटुंब बनवायला आलेले नाही."
सोनाली कुलकर्णी प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. नाटक असो किंवा सिनेमा ती प्रत्येक क्षेत्रात उत्तमोत्तम काम करते. तिच्या अभिनयाची आणि आवाजाची वेगळीच शैली आहे जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते.